एरंडोल तालुक्यातील हनुमंतखेडेसीम येथे ध्वजाचा अवमान : राष्ट्रीय ध्वज नेला खिशात घालून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 04:43 PM2019-01-27T16:43:57+5:302019-01-27T16:44:23+5:30
गुन्हा दाखल
निपाणे, जि. जळगाव : प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयावर फडकविण्यात आलेला राष्ट्रीय ध्वज दुपारीच खाली उतरवून खिशात घेवून जाणाऱ्या प्रदिप ओंकार पाटील (रा. हनुमंतखेडेसीम, ता. एरंडोल) या मद्यपी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून ध्वज उतरविला गेला तरी या ठिकाणी कर्मचारी नव्हता का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एरंडोल तालुक्यातील हनुमंतखेडेसीम येथे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयावर ध्वजारोहण करण्यात आले. दुपारी १ वाजेच्या सुमारास गावातील रहिवाशी प्रदिप पाटील हा दारुच्या नशेत असताना त्याने ग्रामपंचायतीवरील राष्ट्रीय ध्वज उतरवून खिशात घालून घेऊन गेला.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अर्चना खेतमाळीस व कासोदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षत सुनील पवार यांनी घटनास्थळी जावून चौकशी केलीय या प्रकरणी ग्रामसेवक गुणवंत देसले यांनी कासोदा पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून प्रदीप पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप पाटील पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीवर ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर ध्वजाच्या संरक्षणासाठी एकही कर्मचारी नव्हता. या प्रकारास जबाबदार कोण?, याची देखील चौकशी करावी अशीही मागणी केली जात आहे.