१ लाख २३ हजार विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र ‘डिजिलॉकर’मध्ये उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:15 AM2021-05-01T04:15:30+5:302021-05-01T04:15:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना २२ व्या दीक्षांत समारंभापासूनच्या (सन २०१३) १ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना २२ व्या दीक्षांत समारंभापासूनच्या (सन २०१३) १ लाख २३ हजार ५६४ विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र हे डिजिलॉकरमध्ये उपलब्ध असणार आहे. २९ व्या दीक्षांत समारंभात प्रदान केल्या जाणारे पदवी प्रमाणपत्र हे समारंभानंतर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
भारत सरकारच्या डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रमाणपपत्र डिजिलॉकरमध्ये उपलब्ध करून देण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशान्वये डिजिलॉकरवर अकॅडेमिक अवाॅर्ड रेकॉर्ड नोंदणी केली आहे. त्यानुसार सन २०१३ अर्थात विद्यापीठाच्या २२ व्या दीक्षांत समारंभापासून पदवी प्राप्त करणाऱ्या एकूण १ लाख २३ हजार ५६४ विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र हे डिजिलॉकरमध्ये डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. विद्यापीठाने यापूर्वी भारत सरकारच्या निर्देशानुसार यापूर्वीची सर्व पदवी प्रमाणपत्रे ही एनएडीच्या पोर्टलवर डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेली होती. यासाठी विद्यार्थ्यांनी डिजिलॉकर डॉट गव्ह डॉट इन या संकेतस्थळावर किंवा डिजिलॉकर हे ॲप मोबाइल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून विद्यार्थ्यांनी आपला आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांकाद्वारे नोंदणी करावी. त्यानंतर एज्युकेशन या विकल्पावर क्लिक करून आपल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे नाव निवडावे व नंतर पदवी प्रमाणपत्र हा विकल्प निवडून विद्यार्थ्याने आपली शैक्षणिक माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्याला त्याचे पदवी प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात डिजिलॉकरने उपलब्ध होईल.
क्यूआर कोड स्कॅन केल्यास मिळणार माहिती
दरम्यान, प्रमाणपत्रावर क्यूआर कोड असून, त्यास स्कॅन केल्यास आपली शैक्षणिक माहिती उपलब्ध करून घेता येईल. ज्या विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करतेवेळी आपला आधार क्रमांक नोंदविला आहे, अशा विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र आधार क्रमांकाला डिजिलॉकरमध्ये लिंक करण्यात आलेले आहे.
नोकरी व शैक्षणिक कामासाठी उपयुक्त ठरणार
डिजिटल पदवी प्रमाणपत्रावर डिजिटल साईन असून, त्यास माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० नुसार कायदेशीर वैधता राहील. याचा उपयोग नोकरी व शैक्षणिक कामासाठी उपयुक्त ठरणार आहे. २९ व्या दीक्षांत समारंभात पदवी प्रमाणपत्र मागणीसाठी अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांना हे पदवी प्रमाणपत्र ३ मे, २०२१ रोजी दीक्षांत समारंभ संपन्न झाल्यानंतर डिजिलॉकरवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उमविमध्ये पहिलाच प्रयोग
भारतातील एकूण विद्यापीठे, राज्य शैक्षणिक शिक्षण मंडळ, शैक्षणिक संस्था यांच्यापैकी फक्त ९१ विद्यापीठे, राज्य शैक्षणिक शिक्षण मंडळ, शैक्षणिक संस्था यांनी डिजिलॉकरवर नोंदणी केली असून, महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठांपैकी डिजिलॉकरवर विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र उपलब्ध करून देणारे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ ठरले आहे. हा अभिनव उपक्रम प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या मार्गदर्शखाली पद्धती विश्लेषक कपिल गिरी, विशेष कार्यकारी अधिकारी मनोज निळे, ई-सुविधा समन्वयक अमोल पाटील यांच्या तांत्रिक साहाय्याने यशस्वीपणे राबविल्याचे संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ बी.पी. पाटील यांनी कळविले आहे.