ऑक्सिजनची माहिती देण्यास उशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:21 AM2021-04-30T04:21:40+5:302021-04-30T04:21:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रुग्णालयात दाखल रुग्णांना आवश्यक असलेले ऑक्सिजन संपण्यापूर्वी १२ तास आधी कळविणे आवश्यकता असताना केवळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रुग्णालयात दाखल रुग्णांना आवश्यक असलेले ऑक्सिजन संपण्यापूर्वी १२ तास आधी कळविणे आवश्यकता असताना केवळ अर्धा तास बाकी असताना वॉर रूमला माहिती देऊन प्रशासनास धावपळ करण्यास भाग पाडल्याने शहरातील अश्विनी हॉस्पिटल व अरूश्री हॉस्पिटलला नोटीस देण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी ही नोटीस दिली असून दोन दिवसांत खुलासा मागविण्यात आला आहे.
हर्षिता गॅस, हिंदुस्थान गॅस यांच्याकडे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असतानाही मागणी न करता अर्धा तास आधी फोनवर ही माहिती या रुग्णालयांनी दिल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. यासह रुग्णांना परस्पर इतर ठिकाणी हलविण्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले आहे. ही बाब गंभीर असून याबाबत दोन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून खुलासा न आल्यास मान्यता निलंबित करण्याचा इशारा देण्यात आला आहे.