रावेरमध्ये विषबाधेतून १२९ मेंढ्या दगावल्या, ४० ते ५० मेंढ्या बचावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 09:55 PM2018-11-08T21:55:25+5:302018-11-08T21:55:27+5:30
तालुक्यातील मुंजलवाडी-शिंदखेडा रस्त्यावर समोरून एसटी बस आल्याने रस्त्यावरील मेंढ्या विस्कळीत होऊन रस्त्यालगतच्या ज्वारीच्या दुरईच्या शेतात घुसून त्यांनी दुरईचे कोंबटे खाल्ल्याने विषबाधा होऊन सुमारे १२९ मेंढ्या दगावल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास रावेर शिवारात घडली.
रावेर - तालुक्यातील मुंजलवाडी-शिंदखेडा रस्त्यावर समोरून एसटी बस आल्याने रस्त्यावरील मेंढ्या विस्कळीत होऊन रस्त्यालगतच्या ज्वारीच्या दुरईच्या शेतात घुसून त्यांनी दुरईचे कोंबटे खाल्ल्याने विषबाधा होऊन सुमारे १२९ मेंढ्या दगावल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास रावेर शिवारात घडली. दुष्काळात कोणत्याही शासकीय वा निमशासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये, असे शासनाचे सक्त आदेश असताना व वैद्यकीय तथा पशुवैद्यकीय सेवा ही अत्यावश्यक सेवा असताना तालुका लघु सर्वपशु चिकित्सालयातील पशुवैद्यकीय अधिकारी वा जि. प. पशुसंवर्धन विभागाचे संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी तातडीच्या औषधोपचारासाठी उपलब्ध न झाल्याने तब्बल १२९ मेंढ्या तातडीच्या औषधोपचाराअभावी दगावल्याने कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. पशुवैद्यकीय अधिकार्यांची दिवाळी उत्साहात साजरी केली असली तरी मेंढपाळ पशुपालकांची दिवाळी मात्र पशुधनाच्या जीवितहानीमुळे अंधारात गेल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे.
मुंजलवाडी शिवारात वनचराईसाठी तालुक्यातील अहिरवाडी येथील यादव काळू सलगर, तारामण पुना कोळपे, लखा पुना कोळपे, बाळू बापू होळकर, लक्ष्मण काळू सलगर यांनी त्यांचा सुमारे तीन हजार मेंढ्यांचा कळप बसवला आहे. आज सायंकाळी मेंढ्या चारून मुंजलवाडी शिवारातील वाड्यावर परत जात असताना समोरून मुंजलवाडीकडून रावेरकडे जाणारी एसटी बस आल्याने मेंढ्याचा कळप विस्कळीत होऊन १५० ते १७५ मेंढ्या रस्त्यालगतच्या शांताराम हरी पाटील (रा, खिरोदा, प्र. रावेर) यांच्या रावेर शिवारातील ज्वारीच्या दुरईच्या शेतात घुसल्या. त्यांनी ज्वारीच्या दुरईचे कोंबटे (अंकुर) खाल्ल्याने सदरच्या मेंढ्या शेताबाहेर मार्गक्रमण करीत असताना गुंगीत पडतझडत जागच्या जागी दगावून खाली कोसळू लागल्याने मेंढपाळांचे धाबे दणाणले.
मेंढ्यांना ज्वारीच्या कोंबट्यांमुळे विषबाधा झाल्याचा गंभीर प्रकार त्यांच्या ध्यानात येताच त्यांनी माजी जि. प. सभापती सुरेश धनके व धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप सावळे यांच्याशी संपर्क साधला. तत्पूर्वी शिवसेनेचे रावेर शहरप्रमुख नितीन महाजन यांच्या हा प्रकार ध्यानात येताच त्यांनी पं. स. सदस्य पी. के. महाजन, तहसीलदार विजयकुमार ढगे व प्रभारी गटविकास अधिकारी एच. एन. तडवी यांना घटनेची माहिती कळवून तातडीच्या उपाययोजना करण्याची विनंती केली.
दरम्यान, घटनास्थळी माजी जि. प. सभापती सुरेश धनके यांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित मेंढपाळांचे सांत्वन करून पशुवैद्यकीय अधिका-यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दिवाळीच्या सुटीमुळे संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी बाहेरगावी असल्याची माहिती प्राप्त झाली. शासनाने दुष्काळात कोणत्याही शासकीय वा निमशासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये असे सक्त आदेश दिले असताना व वैद्यकीय तथा पशुवैद्यकीय सेवा ही अत्यावश्यक सेवा असताना तालुका लघु सर्वपशु चिकित्सालयातील पशुवैद्यकीय अधिकारी वा जि. प. पशुसंवर्धन विभागाचे संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयावर हजर नसल्याने संबंधित दोषींविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख नितीन महाजन यांनी करून तीव्र संताप व्यक्त केला.
दरम्यान, माजी जि. प. सभापती सुरेश धनके व धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप सावळे, पं. स. सदस्य पी के महाजन यांनी तातडीने वरिष्ठ पातळीवर संपर्क साधला असता, उशिरा प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंदा पाटील, डॉ. अतुल लहासे व डॉ. किशोर पाटील यांनी घटनास्थळी मिळेल ती औषधे घेऊन धाव घेतली. पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकार्यांचे पथक घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच ज्वारीच्या दुरईचे कोंबट्यांमुळे विषबाधा होऊन त्या शेतातून बाहेर पडत असताना, वाटेतच पडतझडत खाली पडून १२९ मेंढ्या दगावल्याची खळबळजनक घटना घडली.
दरम्यान, संबंधित पशुवैद्यकीय डॉक्टरांनी केलेल्या औषधोपचारामुळे मात्र ३५ ते ४० मेंढ्या बचावल्या. घटनास्थळी रावेर सजा तलाठी डी व्ही कांबळे यांनी जावून १२९ मेंढ्या विषबाधा होवून दगावल्याने पावणे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा केला आहे. दरम्यान, ऐन दिवाळीत पशुधन दगावल्याने पाचही मेंढपाळ कुटूंबीयांनी शोक अनावर झाल्याने मोठा आक्रोश केल्याने प्रत्यक्षदर्शीन ममन हेलावून गेले. संबंधित जबाबदार पशुवैद्यकीय अधिकार्यांनी दिवाळी आनंदात साजरी केली असली तरी, त्यांच्या औषधोपचाराअभावी भटक्या मेंढपाळांवर मात्र दु:खाचा डोंगर कोसळल्याचे त्यांना सोयरसुतक नसल्याने जनसामान्यांमधून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, काही पुढाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होवून बचाव कार्यासाठी धडपड न करता या दु:खद प्रसंगातही मृत मेंढ्यांसोबत मोबाईल कॅमेर्यात फोटोसेशन करण्याची संधी न सोडल्याने व मेंढपाळांवर कोसळलेल्या संकटाची पर्वर न करता मरणासन्न मेंढ्याना उचलून नेणाऱ्या मटणविक्रेत्या व्यावसायिकांची झालेली चंगळ पाहून संवेदना बोथट झाल्याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली.