रेल्वे स्थानकावर महिलेची प्रसूती; बाळ दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 12:25 PM2019-07-04T12:25:49+5:302019-07-04T12:26:43+5:30
नवजीवन एक्सप्रेसने जात होते राजस्थानला
जळगाव : चेन्नई येथून राजस्थानात जात असताना नवजीवन एक्सप्रेसमध्ये प्रसुती कळा झालेल्या शारजादेवी हंसराज प्रजापती (३०, रा.सेल्लोरा, राजस्थान) या महिलेची जळगाव रेल्वेस्थानकावरच प्रसूती झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता फलाट क्र.२ वर घडली. वेळीच उपचार न मिळाल्याने नवजात बाळाचा मात्र मृत्यू झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शारजादेवी, पती हंसराज व शारजादेवीचा काका रामगोपाल प्रजापत असे नवजीवन एक्सप्रेसने चेन्नई येथून राजस्थानात जात असताना जळगाव स्थानक येण्याच्याआधीच शारजादेवीला प्रसूती कळा होऊ लागल्याने जळगाव स्थानकावर गाडी फलाट क्र. २ वर थांबल्यानंतर दवाखान्यात नेण्याच्या तयारीत असतानाच शारजादेवी प्रसूत झाली.
रेल्वे स्टेशनवरील लोहमार्ग, सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच सफाई काम करणाºया महिलांनी या कामी मदतकार्य केले.
प्रसूती झाल्यानंतर बाळासह मातेला शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे डॉ.मोहित पाटील यांनी बाळाला मृत घोषीत केले. मातेची प्रकृती चांगली असून सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. मृत बाळाचा अंत्यविधी जळगावातच करण्यात आला.
शारजादेवीचा पती हंसराज हा चेन्नई येथे मोबाईल दुरुस्तीचे कामे करतो. पत्नी गरोदर असल्याने तो तिला सोडण्यासाठी राजस्थानात जात होता, मात्र तत्पूर्वीच अशी घटना घडली. रेल्वे स्थानकावरुन रुग्णवाहिका मिळण्यास विलंब झाला. प्रतीक्षेनंतर महिलेला रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे बाळाला मृत घोषीत करण्यात आले. शारजादेवी हिला एक मुलगा व एक मुलगी आहे. ही तिसरी प्रसूती होती. प्रसूती दरम्यान महिलेला लोहमार्गचे रवींद्र पाटील, योगेश चौधरी, एन.के.निकम, शैलेश पाटील, मनोज मेश्राम, योगेश अडकणे, सफाई कामगार सुनीता शांताराम व ज्ञानेश्वर वाघ यांनी मदतकार्य केले.