डेल्टा प्लसचे संकट दारात तरीही ४ टक्केच तरूणाईला लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:12 AM2021-06-28T04:12:42+5:302021-06-28T04:12:42+5:30
आनंद सुरवाडे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र सरकारकडून १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण १ मे पासून सुरू तर ...
आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्र सरकारकडून १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण १ मे पासून सुरू तर झाले. मात्र, राज्यसरकारने मध्येच त्याला ब्रेक लावल्याने गेल्या दीड महिन्यात जिल्ह्यातील केवळ ४ टक्के तरूणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. शिवाय येणारे अडथळ्यांमुळे शिवाय कोविशिल्ड लसीचाच अधिक पुरवठा असल्याने मोठ्या प्रमाणात तरूणांचा दुसऱ्या डोस अधिकाधिक लांबणीवर जात आहे. त्यामुळे तरूणाई सुरक्षित होणार कधी हा प्रश्न समोर आला आहे.
जिल्ह्याची लोकसंख्याही ४७ लाख ग्राह्य धरली जात असून यापैकी ३५ टक्के लोकसंख्या ही १८ ते ४४ वयोगटाची असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते. जिल्ह्याची एकत्रित स्थिती बघता या वयोगटाचेच लसीकरण सर्वात कमी झाले आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचे वादळ आले असताना अद्याप कोविशिल्डचा या वयोगटात कुणाला दुसरा डोस मिळालेला नाही. लस पुरेशी उपलब्ध होत नसल्याने या मोहिमेतील ही मोठी अडचण वाढली आहे. शिवाय ऑनलाईन ऑफलाईनच्या गोंधळात या वयोगटाला वेळेवर लस मिळत नसल्याचे चित्र आहे.
काळ का वाढतोय?
जिल्ह्यात सर्वाधिक पुरवठा हा कोविशिल्ड लसीचाच होत आहे. त्या तुलनेत कोव्हॅक्सिन ही अगदी मोजकी येत आहे. मात्र, कोव्हॅक्सिन ही केवळ दुसऱ्या डोससाठी राखीव आहे. कोविशिल्ड लसीचे पहिल्या व दुसऱ्या डोसमधील अंतर हे ८४ दिवसांचे करण्यात आले आहे. मे महिन्यात केवळ २०७८६ तरूणांनी लस घेतली होती. त्यामुळे त्यांचा दुसरा डोस हा ऑगस्ट महिन्यात घेता येणार आहे तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात लस घेतलेल्यांना सप्टेंबर अखेरपर्यंत दुसरा डोस मिळणार आहे. ब्रेक न लागता सरसकट लसीकरण झाले असते तर कदाचित ऑगस्टपर्यंत हा वयोगट सुरक्षित झाला असता, मात्र, आता दिवसेंदिवस लस उपलब्ध होत नसल्याने या वयोगटाच्या लसीकरणाला ब्रेक लागत असून पुढील काळ वाढत आहे.
तिसऱ्या लाटेत काय?
डेल्टा प्लस व्हेरियंट आणि तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असताना सर्वात जास्त बाहेर पडणाऱ्या वयोगटालाच दुसरा डोस दोन महिन्यांनी मिळणार असल्याने हा वयोगट या काळात कसा सुरक्षित राहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पहिल्या डोसनंतर १४ दिवसांनी काही प्रमाणात ॲन्टीबॉडीज तयार होतात, दुसऱ्या डोसनंतर अधिक सुरक्षितता प्रदान होते, असे तज्ञ सांगतात.
१८ ते ४४ वयोगट
कोविशिल्ड पहिला डोस : ५४९६६, दुसरा डोस : ००
कोव्हॅक्सिन पहिला डोस : १४८६७, दुसरा डोस : ८५८४