विना मास्क प्रवाशांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:12 AM2021-04-03T04:12:45+5:302021-04-03T04:12:45+5:30
बसस्थानकासमोर पुन्हा थाटले अतिक्रमण जळगाव : नवीन बसस्थानकासमोर गेल्या आठवड्यात मनपा अतिक्रमण विभागातर्फे जोरदार कारवाई करून अतिक्रमण हटविण्यात आले ...
बसस्थानकासमोर पुन्हा थाटले अतिक्रमण
जळगाव : नवीन बसस्थानकासमोर गेल्या आठवड्यात मनपा अतिक्रमण विभागातर्फे जोरदार कारवाई करून अतिक्रमण हटविण्यात आले होते. यामुळे स्थानकाबाहेरील सर्व परिसर मोकळा झाला होता. मात्र, मनपाची कारवाई थंडावल्याने पुन्हा या ठिकाणी जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी मनपा प्रशासनाने पुन्हा अतिक्रमण मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
दुभाजकांमधील झाडांना पाणी देण्याची मागणी
जळगाव : मनपातर्फे गेल्या वर्षी पावसाळ्यात शहरातील अनेक ठिकाणच्या दुभाजकांमध्ये झाडे लावण्यात आली होती. सुरुवातीला काही महिने नियमित पाणी देण्यात आले. मात्र, कालांतराने पाणी देणे बंद झाल्याने, उन्हाळ्यात ही झाडे वाळू लागली आहेत. तरी मनाला प्रशासनाने उन्हाळ्यात या झाडांना नियमित पाणी देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
उत्तराखंडमध्ये जाण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य
जळगाव : भुसावळ विभागातून उत्तराखंडमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना उत्तराखंड शासनातर्फे आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र उत्तराखंड प्रशासनातर्फे भुसावळ विभागाला पाठविण्यात आले आहे. त्यामुळे उत्तराखंडला जाणाऱ्या प्रवाशांनी कोरोना चाचणीचा आरटीपीसीआर अहवाल सोबत ठेवणे गरजेचे असल्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नवीपेठेत गल्ली-बोळीत साचले कचऱ्याचे ढीग
जळगाव : शहरातील नवी पेठेत अनियमित साफसफाईमुळे मोठ्या अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे रहिवासी व व्यावसायिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तरी मनपा प्रशासनाने नवीपेठेत नियमित स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.