ममुराबादला कोविड लसीकरण सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:16 AM2021-05-08T04:16:27+5:302021-05-08T04:16:27+5:30
ममुराबाद : गावात कोविड लसीकरणाची कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर जावे लागत ...
ममुराबाद : गावात कोविड लसीकरणाची कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर जावे लागत असून, तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. विशेषतः वयोवृद्धांचे खूप हाल होत आहेत. त्यामुळे ममुराबाद उपकेंद्रात कोविडचे लसीकरण तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.
धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ममुराबादसह सावखेडा, आवार, तुरखेडा, नांद्रा खुर्द, खापरखेडा, विदगाव आदी बरीच गावे येतात. ममुराबाद गावचीच लोकसंख्या सुमारे १२ ते १५ हजार आहे. अर्थात धामणगाव आरोग्य केंद्रात सध्या सुरू असलेल्या कोविड लसीकरणासाठी सगळ्यात जास्त गर्दी ममुराबाद ग्रामस्थांची राहत आहे. ममुराबादच्या ग्रामस्थांसाठी स्थानिक पातळीवर आरोग्य उपकेंद्रात कोविड लसीकरणाची व्यवस्था करण्याची नितांत गरज आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने त्यादृष्टीने आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करण्यासाठी हालचाल केल्यास समस्या मार्गी लागू शकेल, असेही ग्रामस्थांनी म्हटले आहे.