पारोळा भुईकोट किल्ल्याचे संवर्धन करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:48+5:302021-06-30T04:11:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पारोळा येथील भुईकोट किल्ल्याचे संवर्धन करण्याची मागणी हिंदु राष्ट्र सेनेने केली आहे. त्यासाठी पुरातत्व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पारोळा येथील भुईकोट किल्ल्याचे संवर्धन करण्याची मागणी हिंदु राष्ट्र सेनेने केली आहे. त्यासाठी पुरातत्व आणि वास्तु संग्रहालयाच्या संचालकांना निवेदन देखील पाठवण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पारोळा येथील भुईकोट किल्ला हा अठराव्या शतकातील आहे. हा किल्ला १७२७ मध्ये हरी सदाशिव दामोदर यांनी निर्माण केल्याची नोंद आहे. त्यानंतर सरदार नेवाळकरांच्या कारकिर्दीत पारोळा एक मोठी व्यापारी पेठ म्हणून उदयास आली. तसेच राणी लक्ष्मीबाई यांच्या माहेरचे वंशज तांबे घराणे आजही पारोळा गावात राहते. या भुईकोट किल्ल्याकडे जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व खाते यांनी दुर्लक्ष केले आहे. किल्ल्याच्या अनेक भागांची पडझड झाली आहे. अनेक जण या ठिकाणाचा उपयोग मद्य पिणे, जुगार खेळणे यासाठी करतात. तेथे कोणतीही ऐतिहासिक माहिती देणारा फलक लावलेला नाही. या किल्ल्याच्या आवारात चिखल आणि घाण पसरली आहे. तसेच खंदकाच्या काठावर मोठी अतिक्रमणे झाली आहेत. या किल्ल्याची डागडुजी व दुरूस्ती लवकरात लवकर करण्यात यावी, तसेच माहिती देणारा फलक लावावा. त्याचे हिंदु जनजागृती समिती, जिल्हा प्रशासन, पुरातत्व विभाग यांच्या एकत्रित बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी देखील हिंदुराष्ट्र सेनेने केली आहे.या निवेदनाची प्रत राज्याचे सांस्कृतीक मंत्री अमित देशमुख यांनाही सादर केली आहे. या निवेदनावर मोहन तिवारी, गजानन माळी, तुषार सुर्यवंशी, मनोज चौधरी, तेजस वाघ, मनोज चौधरी, गजानन तांबट, सुशील इंगळे यांनी स्वाक्षरी केली आहे.