कोविशिल्डची मागणी ४४ हजारची मिळाले मात्र २४ हजार ३२० डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:14 AM2021-01-15T04:14:15+5:302021-01-15T04:14:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरणाचे कोविशिल्ड लसीचे अपेक्षीत डोस प्राप्त न झाल्याने लसीकरण केंद्रांची संख्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरणाचे कोविशिल्ड लसीचे अपेक्षीत डोस प्राप्त न झाल्याने लसीकरण केंद्रांची संख्या दोनच दिवसात तेरावरून थेट ७ वर आली असून आता जिल्ह्यातील सातच केंद्रांवर हे लसीकरण होणार आहे. जिल्ह्याला ४४ हजार डोस अपेक्षित असताना प्राप्त मात्र, २४ हजार ३२० झाल्याने हे केंद्र घटविण्यात आले आहेत. मात्र, येत्या काही दिवसात उर्वरित डोस प्राप्त होतील, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयातील औषध शास्त्र विभागाच्या केंद्रातून ही लस ठरलेल्या सात केंद्रांवर गुरूवारी रवाना करण्यात आली. त्यात महापालिकेच्या यंत्रणेला पहिले हे डोस देण्यात आले. महापालिकेच्या आरोग्य कर्मचारी ज्योत्स्ना वासनिक, मोहिनी वायकोळे, सहाय्यक सुनील सपकाळे, शरद मोरे, चालक अकिल बागवान यांनी हे लसीचे डोस एका मोठ्या आईस बॉस्कमध्ये ठेवून महापालिकेला रुग्णवाहिकेत रवाना केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जामदार, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ, स्टोअर किपर रवींद्र पाटील हे उपस्थित होते.
असे घटविले केंद्र
शासनाला सुरूवातीला महापालिकेतील पाच केंद्रांसह जिल्ह्यातील १३ केंद्र अपेक्षित होती. मात्र, महापालिकेत पुरेशी यंत्रणा नसल्याने ही केंद्र ग्रामीण भागात वळविण्यात आली. आणि १३ केंद्र ठरविण्यात आली. मात्र, यातील चार केंद्र वगळण्यात आली आहे. लसीकरणाच्या दोन दिवस आधी पुन्हा मुक्ताईनगर आणि जळगाव शहरातील नानीबाई रुग्णालय लसीकरणातून वगळण्यात आले आहे. मात्र, टप्प्या टप्पयाने हे केंद्र वाढतील, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली.
या केंद्रांवर लस रवाना
महापालिका डी. बी. जैन रुग्णालय, जामनेर, चोपडा, भुसावळ, चाळीसगाव, पारोळा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव या सात केंद्रांना गुरूवारी दुपारी दोन वाजेपासून ही लस वाटप करण्यात आली.
केंद्र बदलले
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नर्सींग कॉलेजमध्ये लसीचा ड्राय रन घेण्यात आला हाेता. मात्र, मूळ लसीकरणासाठी हे केंद्र बदलून आता ओपीडीच्या वरच्या केंद्रामध्ये ही लसीकरणाची प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी हे केंद्र स्वच्छ करण्यात आले आहे.
जळगाव शहरात मागणी ७ हजार मिळाले एक हजार डोस
महापालिकेच्या शिवाजीनगरातील डी. बी. जैन रुग्णालयात लसीकरणाची प्रक्रिया पार पडणार आहे. महापालिकेअंतर्गत ३ हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन अशा सहा हजार आणि अतिरिक्त हजार अशा ७ हजार डोसेसची मागणी महापालिकेकडून जिल्हा रुग्णालय यंत्रणेला करण्यात आली होती. मात्र, दहा दिवसांसाठी त्यांना एक हजार डोस आणि १ हजार ५० इंजेक्शन देण्यात आले.
कोट
जिल्ह्यात दहा ते ११ दिवस चालेले इतके लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. या दरम्यानच उर्वरित डोस प्राप्त होतील. त्यामुळे सद्य स्थितीत ७ केंद्र असून नंतर ते टप्प्या टप्प्याने वाढविण्यात येणार आहेत. - डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक
शुक्रवारी ७०० जणांना लसीकरणाचे एसएमएस
प्रत्येक केंद्रावर पहिल्या दिवशी शंभर कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असून त्यांची यादी शुक्रवारी अंतिम होऊन तसे एसएमएस या कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार शनिवारी सकाळी ९ ते ५ या वेळेत हे लसीकरण होणार आहे.