जळगावात घरांची मागणी 50 टक्क्याने घटली
By Admin | Published: March 26, 2017 06:27 PM2017-03-26T18:27:45+5:302017-03-26T18:27:45+5:30
नोटाबंदीनंतर घरांच्या किंमती कमी होण्याच्या अपेक्षा अद्यापही कायम असल्याने यंदा गुढीपाडव्याच्या मुहुर्तावरदेखील घर खरेदीसाठी प्रतिसाद नाही.
जळगाव, दि.26- नोटाबंदीनंतर घरांच्या किंमती कमी होण्याच्या अपेक्षा अद्यापही कायम असल्याने यंदा गुढीपाडव्याच्या मुहुर्तावरदेखील घर खरेदीसाठी प्रतिसाद नाही. गेल्या वर्षाच्या तुलनेत घरांची मागणी 50 टक्क्याने घटली आहे. त्यात मार्च अखेरचाही परिणाम जाणवत असून एप्रिलपासून घरांच्या मागणीत मोठी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
साडे तीन मुहुर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला घर खरेदी अथवा बुकिंग करून ठेवले जाते. दरवर्षी यासाठी मोठा प्रतिसाद असतो. मात्र यंदा ‘प्रॉपर्टी मार्केट’मध्ये मंदी जाणवत आहे.
नोटाबंदीच्या चार महिन्यानंतरही झळा
नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीनंतर सर्वात मोठा परिणाम झाला तो जमीन, घर खरेदी-विक्री या व्यवहारावर. अनेकांचे पैसे बँकांमध्ये अडकून गेल्याने व ते काढण्यावर मर्यादा असल्याने हे व्यवहार थांबले होते. चार महिन्यानंतरही हे परिणाम कायम असून मराठी नववर्षालाही त्याला प्रतिसाद नाही.
भाव कमी होण्याच्या अपेक्षा
नोटाबंदीनंतर घरांच्या किंमती कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. केवळ बँकांमध्ये पैसे अडकून पडल्याने हे व्यवहार थांबले होते. घराच्या किंमती कमी होण्याचा याच्याशी काही संबंध नसल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. अद्यापही ही अपेक्षा कायम असल्याने लोक थांबून आहे. मात्र भाव या पेक्षा कमी होणे शक्य नसल्याचेही व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
‘मार्च एण्ड’चाही परिणाम
पाडव्याला घरांना मागणी कमी असण्याचे आणखी एक कारण म्हणजे मार्च अखेरचेही आहे. घर खरेदीसाठी अनेकांना अर्थसहाय्याची गरज असते. त्यात अनेकांचे गृहकर्जाचे काम मार्गी न लागल्याने घरांची खरेदी थांबली आहे.
पाडव्यासाठी केवळ 150 घरांचे व्यवहार अपेक्षित
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यंदा केवळ 150 घरांचे व्यवहार होण्याची अपेक्षा आहे. एरव्ही दरवर्षी ही संख्या दुप्पट असते. तसे पाहता सध्या अनेकांना घराची गरज आहे.