जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांचे बनावट फेसबुक खाते तयार करून पैशाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 11:22 AM2021-05-26T11:22:24+5:302021-05-26T11:22:52+5:30
सायबर क्राईम : मित्राला ५० हजारांचा फटका
जळगाव : येथील तत्कालीन पोलीस अधीक्षक तथा पुणे शहर पोलीस दलातील अप्पर आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार करून पैशाची मागणी केली जात आहे. डॉ.सुपेकर यांच्या एका मित्राला ५० हजारांचा फटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील फेसबुक मित्रांनी हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर सुपेकर यांनी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला व हे खाते तात्काळ बंद केले.
सध्या गुन्हेगारीचे स्वरुप बदलत चालले असून अगदी कमी श्रम व कमी वेळेत झटपट पैसे कमवण्यासाठी ऑनलाईन, सोशल मीडियाचा गैरवापर केला जात आहे. फेसबुकवर बनावट खाते तयार करून त्याद्वारे संबंधित व्यक्तीच्या मित्रांना पैशांची मागणी करणे तसेच अश्लील फोटो, व्हिडिओ तयार करुन शेअर करण्याची धमकी देत लाखो रुपये खंडणी स्वरूपात उकळण्याचे नवे उद्योग सुरू झाले आहेत. यात विशेष करून उच्चभ्रू लोकांना टार्गेट केले जात आहे.
जळगावच्या मित्रांमुळे उघड झाला प्रकार
असाच प्रकार जळगावला पोलीस अधीक्षक राहिलेले डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या बाबतीत घडलेला आहे. डॉ.सुपेकर यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने फेसबुक खाते तयार केले, त्यात या व्यक्तीने त्यांच्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. या रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली. पुण्यातील व्यापारी असलेल्या मित्राने खरच पैशाची गरज असेल म्हणून ५० हजार रुपये ऑनलाईन पाठवले. दरम्यान, सुपेकर यांच्या नावाने बनावट खाते तयार झाल्याचे जळगाव मधील मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ हा प्रकार सुपेकरांना कळविला. सुपेकर यांनी त्याची दखल घेऊन शिवाजी नगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून हे खाते ब्लॉक केले. हे खाते फेक असून कोणीही यावर पैशाचा व्यवहार करू नये असे आवाहन त्यांनी केले. त्यांचा हा मेसेज बघितल्यानंतर ज्या मित्राने ५० हजार रुपये पाठवले, त्यांनी डॉ.सुपेकर यांच्याशी संपर्क केला व आपण ५० हजार पाठविल्याचे त्यांना सांगितले. सुपेकर यांनी तातडीने सूत्र हलविल्यानंतर नऊ हजार रुपये थांबवण्यात यश आले,अन्यथा ही रक्कमही सायबर गुन्हेगाराच्या हातात गेली असती. गेल्याच आठवड्यात जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पाटील व रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक परदेशी यांच्या नावाचे बनावट खाते तयार करण्यात आले होते. जळगावला अप्पर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या नावाने बनावट तयार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
फेसबुकचे फेक खाते ब्लॉक करण्यात आलेले आहे. याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. सायबर गुन्हेगारीचा हा प्रकार असून मोठ्या प्रमाणात असे प्रकार होऊ लागले आहेत,त्यामुळे कोणीही अशा प्रकारांवर विश्वास ठेवून व्यवहार करू नये. आपले खाते सुरक्षित ठेवण्यासाठी ते ब्लॉक करावे व असा प्रकार समोर आलाच तर तात्काळ पोलिसात तक्रार करावी.
- डॉ. जालिंदर सुपेकर, अपर पोलीस आयुक्त,पुणे