ममुराबादला लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:16 AM2021-05-11T04:16:23+5:302021-05-11T04:16:23+5:30
ममुराबाद : गावात कोविड लसीकरणाची कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे ग्रामस्थांना धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर जावे लागत असून, तिथे मोठ्या प्रमाणात ...
ममुराबाद : गावात कोविड लसीकरणाची कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे ग्रामस्थांना धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर जावे लागत असून, तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने विशेषतः वयोवृद्धांचे खूप हाल होत आहेत. त्यामुळे स्थानिक उपकेंद्रात कोविडचे लसीकरण सुरू करावे, अशी मागणी ममुराबाद विकास मंचतर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर सकाळी पाच वाजेपासूनच लस घेण्यासाठी रांगा लागतात. दुपारपर्यंतही गर्दी कमी होत नसल्याने वयोवृद्ध व महिलांना तहान व भूक विसरून याठिकाणी भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागते. अनेकांना बऱ्याचवेळा लस न मिळाल्याने नाईलाजाने घरचा रस्ता धरावा लागतो. वाढती गर्दी लक्षात घेता धामणगाव आरोग्य केंद्रावर एकतर नियमितपणे लसींचा पुरवठा केला जात नाही. लसींचा नेहमीच तुटवडा राहत असल्याने याठिकाणी संबंधित आरोग्य यंत्रणा व नागरिकांमध्ये नेहमीच वादाचे प्रसंग उद्भवताना दिसतात. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनाही पाचारण केले जाते. ही स्थिती लक्षात घेता ममुराबादच्या ग्रामस्थांसाठी स्थानिक पातळीवर आरोग्य उपकेंद्रात कोविड लसीकरणाची व्यवस्था करण्याची नितांत गरज आहे, ही बाब ममुराबाद विकास मंचतर्फे उमेश पाटील, प्रमोद सावळे, सचिन पाटील, सुशील पाटील यांनी पालकमंत्री पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर मंत्र्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना त्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
------------------
फोटो-
ममुराबाद येथे कोविड लसीकरण सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना देताना उमेश पाटील, सचिन पाटील, प्रमोद सावळे.