जीएमसीत ऑक्सिजनची मागणी साडेपाच टनांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:15 AM2021-05-23T04:15:46+5:302021-05-23T04:15:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रुग्ण घटत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील लिक्विड ऑक्सिजनची मागणी ही ८ टनांवरून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रुग्ण घटत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील लिक्विड ऑक्सिजनची मागणी ही ८ टनांवरून साडेपाच टनांवर आली आहे. शिवाय ऑक्सिजन घेऊन येणारे टँकरही वेळेवर येत असल्याने ऑक्सिजनच्या बाबतीत प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच या रुग्णालयात टँकर नसल्याने आधीची सिलिंडरची यंत्रणा कार्यान्वित करावी लागली हाेती.
शनिवारी १४ टन लिक्विड ऑक्सिजन घेऊन टँकर दाखल झाले होते. यात आता तीन दिवसांचे नियोजन होणार आहे. यासह सीटू व सीथ्री कक्षात रोज दीडशे ते दोन सिलिंडर ऑक्सिजन लागत होते. मात्र, त्यांची संख्या घटून आता दहा ते पंधरा सिलिंडरवर आली आहे. या कक्षांमधील रुग्ण मुख्य इमारतीत हलविण्यात आले आहेत. रुग्णसंख्या सातत्याने घटत असल्याने शिवाय खासगीतही ऑक्सिजनची मागणी घटल्याने आता ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होत असल्याचे सांगण्यात आले. मागणी साडेपाच टनांवर आल्याचे ऑक्सिजन समितीचे प्रमुख डॉ. संदीप पटेल यांनी सांगितले.