किमान वेतन कायद्यानुसार पगार देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:12 AM2021-06-19T04:12:34+5:302021-06-19T04:12:34+5:30

जळगाव : गेल्या २० ते २५ वर्षांपासून कंपनीत काम करीत असलो, तरी अद्यापही पुरेसा पगार मिळत नसून, किमान वेतन ...

Demand for pay as per minimum wage law | किमान वेतन कायद्यानुसार पगार देण्याची मागणी

किमान वेतन कायद्यानुसार पगार देण्याची मागणी

Next

जळगाव : गेल्या २० ते २५ वर्षांपासून कंपनीत काम करीत असलो, तरी अद्यापही पुरेसा पगार मिळत नसून, किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे, अशी मागणी बांभोरी, ता.धरणगाव येथील हिताची ऑटोमोबाइल सीस्टम लि. (चॅसिस ब्रेक इंटरनॅशनल लि.) या कंपनीच्या कामगारांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास कामगार, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.

या विषयी सहायक कामगार आयुक्त व कंपनी व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, गेल्या २० ते २५ वर्षांपासून फाउंड्री विभागासह अन्य प्रत्यक्ष उत्पादनाच्या विभागात काम करीत आहे. यात कंपनीचे व कंत्राटदाराचे केवळ नावे बदल होतात. मात्र, कामगारांच्या कामाचे स्वरूप तेच आहे. असे असले, तरी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगार मिळत नसून, साप्ताहिक सुट्ट्या, ओव्हरटाइमचे वेतन व इतर सुविधा पुरविल्या जात नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. या विषयी सहायक कामगार आयुक्त, कंपनी व्यवस्थापन, कंत्राटदार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर, व्यवस्थापनाने शासन नियमाप्रमाणे वेतन देण्यात येईल, असे आश्वासन गावकरी, ग्रामपंचायत सदस्यांसमोर दिले होते. मात्र, अजूनही नियमानुसार वेतन मिळत नसल्याचे कामगारांनी तक्रारीत म्हटले आहे. कामगारांच्या मागण्या मान्य होत नसून, या पुढेही अशीच स्थिती राहिल्यास कामगार, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर चंदू रघुनाथ नन्नवरे यांची स्वाक्षरी आहे.

या विषयी कंपनीचे सहायक महाव्यवस्थापक योगेश सोनार यांच्याशी संपर्क साधला असता, होऊ शकला नाही.

———————

संबंधित कंपनीतील कामगारांनी वेतनाविषयी तक्रार केली होती. या विषयी कंत्राटदाराकडून वेतनाविषयी खात्री करावी, अशा सूचना कंपनीला देण्यात आल्या आहेत.

- सी.एन. बिरार, सहायक कामगार आयुक्त.

Web Title: Demand for pay as per minimum wage law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.