अपूर्ण लॉकडाऊनचा पुनर्विचार करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:17 AM2021-04-20T04:17:23+5:302021-04-20T04:17:23+5:30
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लागू केलेल्या ‘ब्रेक द चेन’अंतर्गत अपूर्ण लॉकडाऊनचा पुनर्विचार करावा यासह विविध मागण्या भाजपच्या ...
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लागू केलेल्या ‘ब्रेक द चेन’अंतर्गत अपूर्ण लॉकडाऊनचा पुनर्विचार करावा यासह विविध मागण्या भाजपच्या जळगाव महानगर व्यापार आघाडीच्या वतीने करण्यात आल्या आहेत. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्यावर्षीदेखील व्यापाऱ्यांवर निर्बंध घालण्यात आले व आतादेखील तीच परिस्थिती आली आहे. त्यामुळे अपूर्ण लॉकडाऊनचा पुनर्विचार करावा तसेच व्यावसायिक मालमत्ता करामध्ये सूट मिळावी, लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे, अपघात विमा मिळावा, लॉकडाऊनमधील बंदच्या कारणामुळे जीएसटी व टीडीएस रिटर्न भरू शकत नाही त्यामुळे त्याची मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशोक राठी यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह इतरांच्या स्वाक्षरी आहे.
मद्य विक्रीला परवानगी
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या ‘ब्रेक द चेन’दरम्यान मद्य विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आता याविषयी राज्य सरकारच्या अवर सचिवांनी आदेश काढून परमिट रूम व वाइन शॉप येथून होम डिलिव्हरीसाठी परवानगी दिली आहे. याविषयीचे आदेश अवर सचिव श्रीरंग घोलप यांनी १९ एप्रिल रोजी काढले असून, त्याची प्रत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविली आहे.
फवारणीची मागणी
जळगाव : शहरात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढतच असून, उपाययोजना म्हणून कीटकनाशक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी कॅट संघटनेच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली आहे. शहरात संसर्ग वाढून दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे याचा विचार करून फवारणी करण्यात यावी, अशी मागणी संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव प्रवीण पगारिया, जिल्हाध्यक्ष संजय शहा, संचालक रामजी सूर्यवंशी, सुभाष कासट, शंकर ललवाणी यांनी केली आहे.
बायोमेट्रिक शिथिल करा
जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानावरील बायोमेट्रिकप्रणाली तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी केली आहे. याविषयी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे.
शासकीय कार्यालयात शुकशुकाट
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांना भेटीवर मर्यादा आणल्या आहे, त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये सध्या शुकशुकाट दिसत आहे. सोमवारीदेखील जिल्हाधिकारी कार्यालय परिसर शुकशुकाट होता.