कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:16 AM2021-09-25T04:16:44+5:302021-09-25T04:16:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात सेवा दिली, त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात सेवा दिली, त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन केले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देखील देण्यात आले.
या निवेदनात म्हटले की, कोरोना काळात शासकीय रुग्णालय व कोविड सेंटर येथे जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधित रुग्णांची सेवा शुश्रूषा करणाऱ्या कंत्राटी डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, कक्षसेवक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, सफाई कामगार, सुरक्षारक्षक यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे, तसेच कोरोना रुग्णांवर उपचार करताना मृत्यू पावलेल्या शासकीय रुग्णालय व कोविड सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत देऊन वारसदारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. शासकीय रुग्णालयात व कोविड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करताना मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना शासकीय नोकरी द्यावी. तसेच आर्थिक मदत द्यावी. कोरोनाकाळात कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी मुकुंद सपकाळे, सुरेश तायडे, साहेबराव वानखेडे, सचिन बिऱ्हाडे, कुंदन माळी, रमेश सोनवणे, प्रा. प्रीतीलाल पवार, जगदीश सपकाळे, प्रथमेश नवले, निशांत नवले, सागर पाटील, मिलिंद तायडे, दत्तात्रय जोशी, मिलिंद डोळे उपस्थित होते.