कॉग्रेसच्या काळात देश मागणारा, मोदींच्या काळात देणारा; राहुल लोणीकर यांची टीका
By सुनील पाटील | Published: June 25, 2023 01:09 PM2023-06-25T13:09:54+5:302023-06-25T13:11:23+5:30
४१ लाख तरुणांना मुद्राचे कर्ज
सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : कॉग्रेस पक्ष सत्तेत असताना देशाला दुसऱ्याकडे हात पसरवावे लागत होते, आता मोदींच्या काळात देश देणारा आहे. सुदैवाने आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. मोदी नसते आणि काँग्रेसचा पंतप्रधान राहिला असता तर आजही आपल्याला सार्वजनिक स्वरूपात फिरता आले नसते अशी टिका भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहूल लोणीकर यांनी केली. राज्यात ४१ लाख बेरोजगार तरुणांना मुद्रा कर्ज वितरीत करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली.
पंतप्रधान मोदी यांच्या कारकिर्दीला ९ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारने राबविलेल्या उपक्रम व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी लोणीकर राज्याच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी ते जळगावात आले असता भाजप कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवास साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री योगेश मैध, नगरसेवक विशाल त्रिपाठी उपस्थित होते.
कोरोना काळात संपूर्ण जगावर संकट कोसळले होते. त्या काळात मोदींनी भारतात लस निर्माण केली. जगाच्या पाठीवर फक्त पाच देश कोविडची लस निर्माण करणारे देश होते. त्यात आपला भारत देश एक आहे. जगातल्या जवळपास ४० देशांना लस पुरविण्याचे काम भारताने केले. नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वामुळे हे शक्य झाल्याचंही राहूल लोणीकर यांनी सांगितले. काँग्रेसच्या काळात आपण मागणारे होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत देणाऱ्यांच्या भूमिकेत आला आहे.
बेरोजगारी, कापसाच्या भावावर मौन
देशात व राज्यात भाजप सत्तेत असल्याने शासकीय योजनेच्या माध्यमातून अनेकांना त्याचा लाभ मिळवून दिला. मोठे उद्योग आणले. अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्याची माहिती दिली. बेरोजगारी,महागाईच्या मुद्यासह २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी मोदी प्रचारार्थ जळगावात आले असता तुम्ही एक खासदार गुजरातला दिला आहे, आता आणखी दोन खासदार निवडून द्या, तुम्हाला जळगावातच कापसावर प्रक्रिया उद्योग करण्यासाठी टेक्सटाईल्स पार्क उभारु असे आश्वासन मोदींनी दिले होते, आता २०२४ निवडणूक आली. आश्वासन तसेच कापसाला भाव मिळत नाही या प्रश्नावर मात्र लोणीकर यांनी मौन बाळगत आमदार सुरेश भोळे यांच्याकडे बोट दाखविले.