दूध उत्पादकांना शासनाने प्रतिलिटर अनुदान देण्याची चाळीसगावात दूध उत्पादकांच्या मेळाव्यात मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 01:48 PM2017-11-26T13:48:59+5:302017-11-26T13:50:00+5:30
चाळीसगावला लवकराच ‘दूध प्लण्ट’
ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 26 - सहकार तत्वावर चालणा-या दूध क्षेत्रात जे उत्पादक दूध जमा करतात त्यांना शासनाने प्रतिलिटर अनुदान द्यावे, अशी मागणी जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी केली.
रविवारी चाळीसगाव येथे डॉ. वर्गिसन कुरिअन यांच्या जयंती व राष्ट्रीय दुग्ध दिनानिमित्त जिल्हा दूध संघाच्यावतीने आयोजित चाळीसगाव तालुक्यातील दूध उत्पादकांच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. सकाळी 10 वाजता मेळाव्याला सुरुवात झाली.
व्यासपीठावर शेषराव पाटील यांच्यासह संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये, प्रशासन विभाग प्रमुख चंद्रकांत पाटील, व्यवस्थापक मृगेंद्र पांडे, तांत्रिक सोयी - सुविधा प्रमुख डॉ. एस. पी. पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विकास इंगळे, डॉ. पंकज राजपूत, प्रशिक्षक सागर भंगाळे, पाचोरा विभागाचे प्रमुख संजय पाटील, पारोळा विभागाचे प्रमुख प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले की, दूध व्यवसाय सचोटी व प्रामाणिकपणे केल्यास ‘घराचे गोकुळ’ होते. ज्याच्या दारी गायी - म्हशी असतात, असे शेतकरी कधीही आत्महत्या करीत नाही. प्रत्येक गावात दूध उत्पादक संस्था वाढू द्या. यामुळे अर्थक्रांती होईल. दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देणा-या दुध संघालाच दूध द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
दुपारच्या सत्रात ग्रामीण पातळीवरील दूध संकलन, सहकाराची तत्वे, दूध उत्पादकांच्या जबाबदा-या, स्वच्छ दूध उत्पादन, आहार संतुलन व त्याचे फायदे, हिरवा चारा उत्पादन, लसीकरण, जंतनिमरूलन, वासरांचे संगोपन याबाबत दूध उत्पादकांना मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रीय डेअरी टप्पा - 1, मिशन मिल्क यासह ग्रामीण भागातील दूध उत्पादन वाढीसाठी प्रायोगिक उपाययोजना यावरही विचारमंथन झाले. तालुक्यातील 90 दूध संस्थांमधील दोन हजार दूध उत्पादक उपस्थित होते.
चाळीसगावला लवकराच ‘दूध प्लण्ट’
चाळीसगाव तालुक्यात उत्पादीत दुधापैकी 45 हजार लिटर दूध जिल्हा दूध संघाला मिळते. यामुळे लवकरच जिल्हा दूध संघाचा स्वतंत्र प्लॅण्ट चाळीसगाव शहरात कार्यान्वीत करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
हिवाळ्यात नैसर्गिकरित्या 20 टक्के दुधाचे उत्पादन वाढते. थंड हवामानामुळे मागणी कमी होते. यामुळेच दुध पावडरचे दर कोसळले असून ही समस्या सार्वत्रिक आहे. जिल्हा दूध संघ यावरही मार्ग काढत असून पावडचे दर टप्प्याने वाढविण्यास संचालक मंडळाची अनुकूलता असल्याचेही यावेळी प्रमोद पाटील यांनी सांगितले.