नियम धाब्यावर बसवणारे डीमार्ट सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:18 AM2021-02-24T04:18:01+5:302021-02-24T04:18:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिरसोली रस्त्यावरील डीमार्टमध्ये कोरोनाबाबतचे नियम धाब्यावर बसवून एकाचवेळी शेकडोंच्या संख्येत ग्राहकांनी गर्दी केल्यामुळे मनपा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिरसोली रस्त्यावरील डीमार्टमध्ये कोरोनाबाबतचे नियम धाब्यावर बसवून एकाचवेळी शेकडोंच्या संख्येत ग्राहकांनी गर्दी केल्यामुळे मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने मंगळवारी डीमार्टला सील ठोकले आहे. आतापर्यंत मनपाने केलेली सर्वात मोठी कारवाई आहे. नियमांचा भंग केल्याने डीमार्ट प्रशासनाविरोधात कायदेशीर कारवाईदेखील करण्यात येणार असल्याची माहिती मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, दुसरीकडे नागरिक व शहरातील अनेक व्यावसायिकांना नियमांबाबत गांभीर्य नसल्याचेच दिसून येत आहे.‘ डीमार्ट’मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची माहिती मनपाच्या पथकाला मिळाल्यानंतर सायंकाळी ७ वाजता मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली मनपाचे पथक डीमार्टच्या ठिकाणी पोहचले. यावेळी डीमार्टमध्ये १०० पेक्षा अधिक ग्राहक असल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे. तसेच डीमार्टच्या पार्किंगच्या आवारातदेखील ग्राहकांची तुफान गर्दी होती.
सर्व ग्राहकांना काढले बाहेर
मनपाचे पथक पोहचल्यानंतर सर्व ग्राहकांना मनपा कर्मचाऱ्यांनी डीमार्ट बाहेर काढले. यावेळी ५० टक्के ग्राहकांनी तोंडावर मास्कच घातला नव्हता. त्यामुळे मनपा उपायुक्तांनी डीमार्ट प्रशासनाला चांगलेच खडसावले. ग्राहक विनामास्क डीमार्टमध्ये वावरत असताना देखील डीमार्टच्या व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना कोणत्याही सूचना दिल्या जात नसल्याचे लक्षात आले.
ग्राहकांवरील दंड ही डीमार्ट प्रशासनाकडूनच वसूल होणार
डीमार्टमध्ये विनामास्क ग्राहक वावरत असतानाही डीमार्ट व्यवस्थापनाने ग्राहकांना कोणतीही सक्ती न केल्याने सुमारे ५० पेक्षा अधिक ग्राहकांना ठोठावण्यात आलेला दंडदेखील डीमार्ट व्यवस्थापनाकडून वसूल केला जाणार असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.
कायदेशीर कारवाई होणार
डीमार्ट व्यवस्थापनाने नियमांचे पालन न केल्याने डीमार्टचे सर्व प्रवेशव्दार सील करण्यात आले. तसेच कोणत्याही उपाययोजना न करणे, ग्राहकांकडे केलेले दुर्लक्ष, एकाच वेळी शेकडोंच्या संख्येत असलेली ग्राहकांची गर्दी यामुळे डीमार्ट व्यवस्थापनाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, मनपाने निर्धारित केलेला दंडदेखील डीमार्ट व्यवस्थापनाकडून वसूल केला जाणार आहे. तसेच डीमार्ट पुन्हा सुरू करण्याबाबतदेखील मनपा प्रशासनच पुढील निर्णय घेणार आहे.