डिमार्ट पुढील पुलाचे काम ‘नही’ व मनपाच्या हेवेदाव्यात रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:21 AM2021-02-17T04:21:36+5:302021-02-17T04:21:36+5:30
रस्ता ‘नही’ च्या हद्दीत : दुभाजक केले तर मनपाला पुलाचे काम करण्यास हरकत काय ? लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव ...
रस्ता ‘नही’ च्या हद्दीत : दुभाजक केले तर मनपाला पुलाचे काम करण्यास हरकत काय ?
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील डिमार्ट पुढील शिरसोलीकडे जाणारा रस्ता आता ‘नही’ च्या हद्दीत असून, गेल्या दोन वर्षांपासून मुस्लीम कब्रस्तानसमोरील पूल तुटलेल्या अवस्थेत आहे. मात्र, या पुलाचे काम अजूनही झालेले नाही. ‘नही’ प्रशासन हे काम मनपाकडे ढकलत आहे. तर मनपा प्रशासन हे काम ‘नही’ कडे ढकलत आहे. या ढकलाढकलीमुळे हे काम झालेले नाही. यामुळे पावसाळ्यात हा रस्ता नेहमी पाण्यात असतो, तसेच कब्रस्थाकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असतात.
शहरातील अनेक रस्त्यांचा हद्दीचा वादामुळे नागरिकांना फटका बसत आहे. केसी पार्ककडील कानळदा रस्ता हा मनपाच्या हद्दीत येतो, मात्र हा रस्ता तालुक्यातील २२ गावांना जोडतो. मनपा व जि.प.च्या वादात या रस्त्याचे काम होऊ शकलेले नाही. आता या रस्त्याचा वाद जुना असताना डिमार्टकडील रस्त्याचाही वाद निर्माण झाला आहे. शिरसोलीकडून येणारा रस्ता आता इच्छादेवी चौकापर्यंत महामार्ग झाल्याने हा रस्ता नहीच्या ताब्यात गेला आहे. मात्र, हा रस्ता जरी नहीच्या ताब्यात असला तरी रस्त्यावरील पुलाचे काम नहीकडून करण्यात आलेले नाही. नहीने हा रस्ता आपल्या ताब्यात असल्याचे पत्रदेखील मनपाकडे पाठविले होते, असे असताना डिमार्टपुढील पुलाचे काम करण्याची जबाबदारी ‘नही’ ची असताना या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे या भागातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
दुभाजकांचे काम केले, तर पुलाचे का नाही ?
मनपा प्रशासनाने वर्षभरापूर्वी इच्छादेवी चौक ते डिमार्टपर्यंतच्या रस्त्यालगत दुभाजकांचे काम पूर्ण केले. मात्र, हा रस्ता नहीच्या ताब्यात असतानाही मनपाने हे काम केले. तर पुलाचे काम करण्यास मनपा प्रशासनाला काय अडचणी आहेत, असा प्रश्न नगरसेवक प्रशांत नाईक यांनी उपस्थित केला आहे. जर हद्द नसतानाही दुभाजक करण्याची तत्परता मनपा प्रशासनाने दाखविली तर पुलाचे काम करण्याचीही तत्परता मनपा प्रशासनाने करावी अशी मागणी नाईक यांनी केली आहे.
पावसाळ्यात साचते पाणी
या पुलाचे काम दोन वर्षांपासून रखडले आहे. मुस्लीम समाजबांधवांनी मनपा प्रशासनाकडे दुरुस्तीची मागणी केली होती. मनपाने हे काम नही चे असल्याचे सांगत पळ काढला. तर नहीने हे काम मनपाच्या अंगावर झटकून मागणीकडे दुर्लक्ष केले. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. खोलगट भाग असल्याने या ठिकाणी पाणी साचते, तसेच पाणी कब्रस्तानात वाहते. त्यामुळे नागरिकांना जाण्यास अडचणी निर्माण होत असतात. हा पूल पूर्ण लवकर करण्याची मागणी होत आहे.