१०० कर्मचारी लसीकरणाचा आज डेमो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:50 AM2021-01-08T04:50:16+5:302021-01-08T04:50:16+5:30
जळगाव : कोरोना लस आल्यानंतर ही लसीकरणाची प्रक्रिया नेमकी राबवायची कशी, याचा डेमो अर्थात ड्राय रन शुक्रवारी जिल्ह्यातील चार ...
जळगाव : कोरोना लस आल्यानंतर ही लसीकरणाची प्रक्रिया नेमकी राबवायची कशी, याचा डेमो अर्थात ड्राय रन शुक्रवारी जिल्ह्यातील चार केंद्रांवर सकाळी साडेआठ वाजेपासून होणार आहे. यात प्रत्येकी २५ अशा शंभर कर्मचाऱ्यांवर हा डेमो होणार आहे.
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जामनेर उपजिल्हा रुग्णालय, धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शहरातील शिवाजीनगर रुग्णालय या ठिकाणी ही प्रात्यक्षिके होणार आहेत. सकाळी साधारण साडेआठ वाजेपासून याला सुरुवात होणार आहे. या ड्राय रनच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी ७ रोजी सकाळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण आणि अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पाहणी करून सूचना दिल्या आहेत.
परिसरातील नर्सिंग कॉलेज येथे ‘‘थ्री रूम सेट अप’’ ही पद्धत राबविण्यात येणार आहे. कक्षांमध्ये सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
अशी असेल प्रक्रिया
प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष असतील. यात सुरुवातीला नोंदणी होणार आहे. त्यानंतर लसीकरणासाठी बोलविण्यात येणार आहे. लसीकरण झाल्यानंतर प्रतीक्षा कक्षात संबंधित कर्मचाऱ्याला नेऊन त्याच्यावर काय परिणाम होतोय, याचे निरीक्षण केले जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर यासाठी पाच कर्मचारी कार्यरत राहणार आहेत, हे केवळ प्रात्यक्षिक असून यात कुठलीही लस टोचली जाणार नाही.
कर्मचारी निवडले
या प्रक्रियेसाठीही ठरावीक आरोग्य कर्मचाऱ्यांची निवड झाली असून, संबंधितांना मेसेज पाठविण्यात आले आहेत. पोर्टलवरही त्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.
डब्ल्यूएचओचे अधिकारी जळगावात
जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेलियन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. अझहर हे या ड्राय रनवर लक्ष ठेवण्यासाठी जळगावात दाखल झाले आहेत. त्यांनी सायंकाळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांच्याकडून माहिती संकलित केली. यावेळी माता बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ उपस्थित होते.