लोकसहभागातून लोकशाहीला बळकटी येईल - डॉ.अविनाश ढाकणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 03:23 PM2020-01-25T15:23:51+5:302020-01-25T15:25:13+5:30
राष्ट्रीय मतदार दिवसाच्या औचित्याने सर्वांनी प्रतिज्ञा करूया आणि आपल्या या भारताच्या लोकशाहीला बळकटी आणूया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केले.
वासुदेव सरोदे
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : भारत जगातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रक्रिया यशस्वीपणे राबवणारा देश आहे. अशा देशात निवडणूक आयोगाची ७० वर्षे पूर्ण होत असताना २०११ पासून अविरतपणे साजरा होणाºया राष्ट्रीय मतदार दिवस उत्सवाचे हे दहावे वर्ष आहे. भारतीय राज्यघटनेने कुठलाही भेदभाव मान्य केला नसतानाही समाजात लिंग असमानता दिसून येते. हा भेद संपवण्यासाठी प्रत्येकालाच कष्ट घ्यावे लागतील. मतदान प्रक्रिया यशस्वीपणे राबवण्यासाठी प्रत्येक घटकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. मतदान आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराला सहजपणे मतदान करता यावे यासाठी विविध सुविधा पुरविल्या जातात. त्यामुळे या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या औचित्याने सर्वांनी प्रतिज्ञा करूया आणि आपल्या या भारताच्या लोकशाहीला बळकटी आणूया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केले.
फैजपूर येथील जे.टी.महाजन इंजिनियरिंग कॉलेजच्या दिगंबर शेठ नारखेडे सभागृहात शनिवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील, महापालिका आयुक्त डॉ.उदय टेकाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोटे, उपायुक्त तडवी, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, महापालिकेचे अजित मुठे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.तुकाराम हुलवडे, परदेशी, धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यासोबत जिल्ह्यातील प्रशासन आणि महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविक फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी केले. त्यात त्यांनी सांगितले की, तरूणाईच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे राष्ट्रीय मतदार दिवस. या दिवसाला फैजपूर उपविभागासाठी कार्यक्रमाला परवानगी दिल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व इतर अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. यासोबत सर्वांच्या सहकार्याने लोकशाहीला अधिक बळकटी आणण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून मतदानाविषयी सकारात्मकता निर्माण करू, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी कुलगुरू प्रा.डॉ.पी.पी.पाटील यांनी निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असून आपल्या भारतीय लोकशाहीला एक उज्वल परंपरा आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीतच असतात. मात्र मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थी, पालक व शिक्षकांनीही पुढाकार घेऊन विकास प्रक्रियेला हातभार लावावा. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये अशी आर्त साद घातली.
यावेळी रावेर व यावल तालुक्यातील नवमतदारांना मान्यवरांच्या हस्ते ईपीक कार्डांचे वाटप करण्यात आले. यासोबत मतदान प्रक्रियेला यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाºया अंगणवाडीसेविका, पोलीस पाटील, बीएलओ, पत्रकार, दिव्यांग मतदार, विविध शाळा, महाविद्यालयांसोबतच विविध स्पर्धा आणि प्रशिक्षणे आयोजित करण्यात सहकार्य करणाºया संस्थांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी भारताच्या रक्षणासाठी उमेदीची वर्ष दिलेल्या सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान करण्यात आला. त्यात युवराज गाढे, भास्कर तायडे, रवींद्र पाटील यांचा जिल्हाधिकाºयांच्या हस्ते सन्मान झाला. तसेच विधानसभा व लोकसभा निवडणुका यशस्वीपणे राबिविल्याबद्दल जिल्हाधिकाºयांचा कुलगुरूंच्या हस्ते त्यांचीच फोटो फ्रेम देऊन हृदयस्थ सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गोटे, डॉ.उदय टेकाळे यांनी मनोगते व्यक्त केली.
तहसीलदार उषाराणी देवगुणे रावेर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तहसीलदार जितेंद्र कुवर, फैजपूर सर्कल जे.डी.बंगाळे यांच्यासोबत प्रशासन व महसुलातील अधिकारी व कर्मचाºयांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा.लेफ्टन राजेंद्र राजपूत यांनी केले.