चाळीसगाव पालिकेत भुयारी गटार योजनेचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 05:42 PM2018-08-10T17:42:05+5:302018-08-10T17:43:08+5:30

प्रोजेक्टरवर सादरीकरण : नगरसेवकांची उपस्थिती

 Demonstration of underground drainage scheme in Chalisgaon municipality | चाळीसगाव पालिकेत भुयारी गटार योजनेचे प्रात्यक्षिक

चाळीसगाव पालिकेत भुयारी गटार योजनेचे प्रात्यक्षिक

Next

चाळीसगाव, जि.जळगाव : महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियांतर्गत प्रस्तावित असलेल्या भुयारी गटार योजनेचे प्रात्यक्षिक प्रोजेक्टरवर शुक्रवारी सकाळी ११ वाजता पालिकेच्या सभागृहात सादर करण्यात आले. या वेळी सत्ताधारी गटातील सर्व तर विरोधी गटातील दोनच सदस्य उपस्थित होते.
शहरात अंतर्गत जलवाहिनी योजनेसाठी शासनाने ७१ कोटी १५ लाख ९० हजार ७५२ रुपये खर्चाची योजना मंजूर केली असून, योजनेची निविदा प्रक्रिया सुरू आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर दरडोई १३५ लीटर पाणी देणे शक्य होणार आहे. त्यामुळे सांडपाण्याची व्यवस्था होणे आवश्यक आहे. भुयारी गटार योजना यासाठीच असल्याचे प्रात्यक्षिकादरम्यान सांगण्यात आले.
शहरात एकूण १७ प्रभाग आहेत. २०११च्या जनगणनेनुसार ९५ हजार ५५१ इतकी लोकसंख्या तर एक हजार ८५९ हेक्टर क्षेत्रफळ आहे. सद्य:स्थितीत उघड्या गटारीतून सांडपाणी व घाण वाहते.
भुयारी गटारीसाठी पुढील ३० वर्षांची लोकसंख्या गृहीत धरुन २०५०पर्यंतची मलनि:स्सारण व्यवस्था प्रस्तावित करण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजनेत १३५ लीटर दरडोई पाणीपुरवठा करण्यास मान्यता मिळाली आहे. घरगुतीसह शैक्षणिक, वैद्यकीय, व्यावसायिक व इतर संस्थांची मलनि:स्सारण सांडपाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. योजनेतच मलनि:स्सारण शुद्धीकरण केंद्रही उभारले जाईल.
या वेळी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, भाजपाचे गटनेते राजेंद्र चौधरी, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, संजय रतनसिंग पाटील, चंद्रकांत तायडे, अरुण अहिरे, नितीन पाटील, विजया प्रकाश पवार, चिराग शेख, विजया भिकन पवार, रंजना सोनवणे, संगीता गवळी आदी उपस्थित होते.
योजनेच्या प्रात्यक्षिक सादरीकरणाविषयी सर्व नगरसेवक सदस्यांना लेखी पत्राव्दारे सूचित केले होते, अशी माहिती मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली.

Web Title:  Demonstration of underground drainage scheme in Chalisgaon municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.