पोलिसांकडून हद्दपार होण्याआधीच डेम्या जीवनातून हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:11 AM2021-07-12T04:11:49+5:302021-07-12T04:11:49+5:30
जळगाव : पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या डेम्या ऊर्फ महेश वासुदेव पाटील (वय २१, रा. हिराशिवा कॉलनी) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे, ...
जळगाव : पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या डेम्या ऊर्फ महेश वासुदेव पाटील (वय २१, रा. हिराशिवा कॉलनी) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे, गावठी पिस्तुलासह शस्त्र बाळगणे, असे इतर गंभीर गुन्हे दाखल झालेले असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तालुका पोलिसांनी डेम्याला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र, तो मंजूर होण्याआधीतच बापू राजपूतने त्याला जीवनातून कायमचे हद्दपार केले. दरम्यान, रविवारी दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर डेम्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
डेम्याचे वडील वासुदेव मुरलीधर पाटील (वय ४३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बापू संतोष राजपूत, मयूर नरेंद्र पाटील, गजेंद्र ऊर्फ गोलू युवराज सूर्यवंशी (तिन्ही रा. हिराशिवा कॉलनी) व ईश्वर अशोक पाटील (रा. पिंप्राळा) या चौघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील गजेंद्र याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राजपूत याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तेथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. रुग्णालयातून सुटका होताच, त्याला अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी दिली.
एकाने पकडून ठेवले, तिघांनी वार केले
डेम्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी रात्री महेश ऊर्फ डेम्या, बापू संतोष राजपूत, मयूर पाटील व गजेंद्र ऊर्फ गोलू सूर्यवंशी असे पाण्याच्या टाकीजवळ दारू पीत होते. त्यावेळी त्यांचा वाद झाला. जोरजोरात होणारा आवाज ऐकू आल्याने आपण बाहेर जाऊन पाहिले असता ईश्वर पाटील याने डेम्याला पकडून ठेवले होते, तर उर्वरित तिघे जण आळीपाळीने एकमेकांच्या हातात चाकू घेऊन डेम्याच्या पोटावर, मानेवर व छातीवर वार करीत होते. हे दृश्य पाहून आपण आरडाओरड केल्याने त्यांनी मुलाला सोडून दिले व तो रडत, ओरडत बाहेर येऊन मोकळ्या जागेत खाली पडला. मी त्याच्या मागे धावलो असता मुलाला ईश्वर याने पकडून ठेवले तर तिघांनी हल्ला केल्याचे त्याने सांगितले. ८ जुलै रोजीदेखील या तिघांचा डेम्याशी वाद झाला होता व तेव्हा ते रात्री ११ वाजता त्याला शोधण्यासाठी घरी आले होते, फिर्यादीत नमूद आहे.
एरियातील दादागिरीवरून संघर्ष
घटना घडल्यानंतर बापू राजपूत याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्याकडून घटना जाणून घेतली असता बापू याने सांगितले की, रामानंदनगर पोलिसांनी पिस्तुलासह जेव्हा डेम्याला पकडले होते व तो पिस्तूल आपल्यासाठीच आणला होता असे समजल्यावर तू वयाने लहान आहे, या वादात पडू नको असे त्याला आपण समजावले. मात्र, तो ऐकण्याच्या मन:स्थित नव्हता. यापूर्वीदेखील त्याने बऱ्याचदा वाद घातला होता, असेही राजपूत याने पोलिसांना सांगितले. दोघंही एकमेकांच्या घरासमोरच वास्तव्याला असल्याने दादागिरी कोणाची? यावरूनच दोघांमध्ये संघर्षाच्या ठिणग्या पडत होत्या. डेम्या हा बापूचा गेम करायला आला आणि तेथे त्याचाच गेम झाला आहे. एरियाच्या दादागिरीवरून याआधी शनी पेठ, जळगाव शहर व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गँगवार उफाळून आलेले आहे.
घटनास्थळावर दारू, पाण्याच्या बाटल्या
खुनाची घटना जेथे घडली, तेथे पाण्याच्या टाकीखाली दारूच्या दोन बाटल्या, पाण्याच्या दोन बाटल्या व दोन ग्लास आढळून आलेले आहेत. त्यातील दारूची एक बाटली रिकामी झालेली आहे, तर दुसऱ्या बाटलीतील काहीअंशी दारू ग्लासात ओतलेली होती. टाकीच्या बाहेर डेम्याची चप्पल पडलेली होती. फॉरेन्सिक पथकाने येथून काही पुरावे संकलित केले आहेत. चॉपर जप्त करण्यात आला आहे.
कोट...
चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून रात्रीच एकाला अटक करण्यात आली आहे. मुख्य संशयित रुग्णालयात आहे. सुटका झाल्यानंतर लगेच त्याला अटक केली जाईल. अन्य संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. दोघांमधील जुन्या वादातूनच ही घटना घडली आहे. घटनास्थळावरून पुराव्यासाठी काही नमुने संकलित करण्यात आलेले आहेत.
-रविकांत सोनवणे, पोलीस निरीक्षक