जळगावात पुन्हा डेंग्यूचा डंख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:07 PM2018-08-30T12:07:23+5:302018-08-30T12:07:45+5:30
विजयकुमार सैतवाल
कधी नव्हे एवढ्या प्रमाणात गेल्या वर्षी कहर करीत शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरलेल्या डेंग्यूने यंदाही पाय पसरविण्यास सुरुवात केली असून हजारो घरात डेंग्यूच्या आळ््या आढळल्याने पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे दोन आठवड्यांपासून आरोग्य विभागाच्यावतीने फवारणी, धुरळणी केली जात असली तरी दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.
गेल्या वर्षी शहरामध्ये डेंग्यू आजाराने कहर केला होता. रक्त तपासणीचा अनुभव पाहता दररोज किमान १० डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याचे त्या वेळी दिसून आले होते. त्यामुळे मनपाच्यावतीने कित्येक दिवस सर्वेक्षण करण्यात आले. गेल्या वर्षाचा हा अनुभव पाहता यंदा उपाययोजना वाढणे गरजेचे आहे. मात्र हा अनुभव गांभीर्याने घेतला जात आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जून महिन्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर मोठा खंड पडला. तसेच जुलै व आॅगस्ट महिन्यातही पावसाने दडी मारल्याने वातावरणात बदल होऊन अनेकांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याच्या तक्रारी वाढल्या. यात अनेकांना पोटदुखी व जुलाबचा त्रास वाढला. त्यानंतर आता डेंग्यूने डोके वर काढले. यात भोईटेनगरातील सहा वर्षीय बालकास त्याची लागन झाली. या मुळे बालकाचे कुटुंब भयभीत होण्यासह परिसरातही भीतीचे वातावरण पसरले. त्यानंतर लगेच आदर्शनगरातील एका तरुणास डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले. या सोबतच मनपाच्या आरोग्य विभागाकडे १७ रुग्ण असल्याच्या तक्रारी आल्या. हळूहळू ही संख्या वाढत जाऊन आतापर्यंत २७ रूग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची ही वाढती संख्या पुन्हा चिंतेची बाब बनत आहे. मनपाच्यावतीने आतापर्यंत २२ हजार ६७४ घरांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये १ हजार १७० घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. सुमारे ७१ हजार ६५० भांडे हे दुषित आढळून आले आहेत. ज्या १ हजार १७० घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. त्यातील बहुतांश घरे हे उच्चभ्रु भागातील आहे. या सोबतच शहरातील मेहरुण परिसर, वाघ नगर, रुख्मीनी नगर, समता नगर या भागातदेखील डेंग्यू सदृष्य आजाराची लक्षणे असल्याचे या परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. या भागात ताप येणे, डोके दुखणे, मळमळणे अशी लक्षणे असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. हे नागरिक खाजगी रुग्णालयात धाव घेत असून उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. ज्या भागात डेंग्यू असल्याच्या तक्रारी येत आहे, तेथे महापालिकेच्यावतीने अबेटिंग व फवारणी केली जात आहे, मात्र इतर भागांचाही मनपाच्या आरोग्य विभागाने विचार करून तेथे अबेटिंग व फवारणी करण्याचीही मागणी होत आहे.