डेंग्यू पसरवतोय हातपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 12:34 PM2019-10-01T12:34:42+5:302019-10-01T12:35:04+5:30
दररोज १० ते १२ डेंग्यू सदृश्य रुग्ण
जळगाव : शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दररोज एकेका रुग्णालयात १० ते १२ डेंग्यू सदृष्य रुग्ण येत आहेत. डेंग्यूच्या रक्ततपासणीचीही संख्या वाढत असल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे शहरात डेंग्यूच्या औषधीचाही तुटवडा भासत आहे.
वातावरणात बदल होऊन अनेकांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याच्या तक्रारी वाढून अनेकांना पोटदुखी व जुलाबचा त्रास वाढला. त्यानंतर गेल्या १० ते १२ दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
सध्या दररोज दोन ते तीन रुग्ण डेंग्यूचे येत असल्याची माहिती मिळाली. तीन ते चार दिवसांपासून थंडी-तापचा त्रास होऊन रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर रक्त तपासणीमध्ये डेंग्यू असल्याचे निदान होत आहे.
या मुळे रुग्णांच्या कुंटुंबासह परिसरातही भीतीचे वातावरण पसरत आहे. या सोबतच एकेका खाजगी रुग्णालयात दोन ते तीन डेंग्यूचे रुग्ण दाखल असल्याची माहिती मिळाली.
शहरातील खोटे नगर, मेहरुण परिसर, वाघ नगर, रुख्मीनी नगर, समता नगर या भागातदेखील डेंग्यू सदृष्य आजाराची लक्षणे असल्याचे सांगितले जात आहे. या भागात ताप येणे, डोके दुखणे, मळमळणे अशी लक्षणे असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. हे नागरिक खाजगी रुग्णालयात धाव घेत असून उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
रक्त तपासणी करणाऱ्यांची संख्या वाढली
रुग्णालयात येणाºया रुग्णांपैकी किमान १० ते १२ रुग्णांमध्ये डेंग्यूचे लक्षणे आढळून येत असून त्यांना डेंग्यू सदृष्य आजार असल्याचे निष्पन्न होत आहे. रुग्णालयात येणाºया रुग्ण रक्त तपासणीही करीत असून ही संख्या आठ ते दहा दिवसांपासून वाढली असल्याचे सांगितले जात आहे. डेंग्यूचे दररोज किमान २ ते ३ रुग्ण आढळत आहे.
औषधींचा तुटवडा
डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना उपाययोजना होणे गरजेचे आहे. असे असले तरी जे रुग्ण आहे, त्यांच्यासाठी शहरात डेंग्यूच्या औषधींचा तुटवडा भासत असल्याची माहितीही मिळाली.
डेंग्यू सदृष्य आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ आहे. गेल्या १० ते १२ दिवसात असे रुग्ण वाढले आहेत. डेंग्यूचे निदान होणाºया रुग्णही काही प्रमाणात आहे. -डॉ. राजेश पाटील, बालरोग तज्ज्ञ