डेंग्यू’ने घेतला तरुणाचा जीव!‘ डेंग्यू’चा डंख, ९ महिन्यात १५० रुग्ण; ८ पाझिटिव्ह
By सुनील पाटील | Published: September 14, 2023 03:57 PM2023-09-14T15:57:06+5:302023-09-14T16:00:16+5:30
जळगाव : ‘ डेंग्यू’ या साथीच्या आजाराने देवेंद्र विकास बारी (वय १९,रा.शिरसोली प्र.बो.ता. जळगाव ) या तरुणाचा गुरुवारी पहाटे ...
जळगाव: ‘डेंग्यू’ या साथीच्या आजाराने देवेंद्र विकास बारी (वय १९,रा.शिरसोली प्र.बो.ता.जळगाव) या तरुणाचा गुरुवारी पहाटे तीन वाजता शहरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. चालू वर्षातील ‘डेंग्यू’चा हा पहिला बळी आहे. जानेवारी ते १४ सप्टेबर या कालावधीत शहरात डेंग्यूचे १५० रुग्ण संशयित तर ८ रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत. शिरसोलीत आणखी एक तरुण डेंग्यू सदृश्य आढळून आलेला आहे.
पावसाळा येताच विविध साथीच्या रोगांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होते. त्यात प्रामुख्याने डेंग्यूच्या साथीचादेखील समावेश असतो. शहरात दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असतात. यंदाही तेच चित्र पाहायला मिळत आहे. हिवताप विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार गेल्या महिन्यात ७४ तर या महिन्यात १४ दिवसात ५५ संशयितांचे अहवाल तपासणीसाठी धुळ्याला पाठविण्यात आलेले आहेत. शिरसोली येथील देवेंद्र बारी या तरुणाला गेल्या आठवड्यात ताप आला होता. शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. रविवारी त्याचा ‘डेंग्यू’चा अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचार सुरु असताच गुरुवारी पहाटे तीन वाजता त्याचा मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये देखील दररोज डेंग्यू सदृश्य आजाराचे २० ते २५ रुग्ण दाखल होत आहेत.
हिवताप विभागाकडून सर्वेक्षण
हिवताप विभागाचे आरोग्य सहायक के.बी.नगराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागामार्फत ८ आरोग्य सेवक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतात. पाण्याच्या टाक्या, भांडे, टायर याची तपासणी करुन ते स्वच्छ केले जाते. खासगी दवाखान्यात रुग्ण आढळला तर त्याचे रक्ताचे नमुने घेऊन धुळे येथील हिरे वैद्यकिय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविले जातात. जेथे रुग्ण आढळला त्याची माहिती मनपाला कळविली जाते. त्यानंतर मनपातर्फे त्या भागात फॉगिंग (फवारणी) केले जाते.