जळगावात उपचारास नकार; हॉस्पीटलमध्ये तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 12:15 PM2018-09-09T12:15:15+5:302018-09-09T12:17:03+5:30
‘सिव्हील’मधून हलविले खासगी दवाखान्यात
जळगाव : उपचाराचे पॅकेज ठरल्यानंतरही अपघातात जखमी रुग्णावर प्लास्टीक सर्जरी करण्यास नकार दिल्याने आर.एच.अग्रवाल अॅक्सीडेंट हॉस्पीटलमध्ये शनिवारी रात्री १० वाजता तणाव निर्माण झाला होता. डॉ.राजेंद्र अग्रवाल यांच्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करीत हॉस्पिटलची तोडफोड करण्याचा दम भरला. दरम्यान, पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
पांडुरंग भिका कोळी (वय ५३, रा.भालशिव, ता.यावल) यांचा महिनाभरापूर्वी दुचाकी घसरल्याने अपघात झाला होता. त्यात त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. परिस्थिती अत्यंत गरीबीची असल्याने कोळी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवस तेथे उपचार केल्यानंतर डॉ.राजेंद्र अग्रवाल यांनी तपासणी करुन शस्त्रक्रिया व प्लास्टीक सर्जरी करण्याचा सल्ला देत या रुग्णाला स्वत:च्या आर.एच. अग्रवाल अॅक्सीडेंट या खासगी रुग्णालयात हलविले.
७० हजाराचे पॅकेज, प्रत्यक्षात खर्च २ लाख
रुग्णाचे नातेवाईक व डॉक्टर यांच्यात ७० हजार रुपयात शस्त्रक्रिया व प्लास्टीक सर्जरी करण्याचे ठरले होते. त्यानुसार डॉ.अग्रवाल यांनी शस्त्रक्रिया केली. शनिवारपर्यंत दोन लाख रुपये खर्च आला. आता प्लास्टीक सर्जरीसाठी डॉ.अग्रवाल यांनी पुन्हा ५० हजाराची मागणी केली. त्यावरुन वादाला तोंड फुटले. डॉक्टरांनी उपचारास नकार देत रुग्णास जनरल वॉर्डात आणून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची इशारा दिला. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले. तणाव निर्माण झाल्याने जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सहकाऱ्यांसह धाव घेत वादावर नियंत्रण मिळविले. यावेळी डॉ.प्रताप जाधव व अन्य सहकारी डॉक्टरांनी मध्यस्थी केल्याने पुढील उपचार करण्याची तयारी डॉ.अग्रवाल यांनी दाखविली.
प्लास्टीक सर्जरी न करता आज रुग्णाला जिल्हा रुग्णालयात हलविण्याची तयारी डॉक्टरांनी केली होती. उपचारासाठी ६० हजारात घेतलेली बैलजोडी ३० हजारात विक्री केली. डॉक्टरांकडून आमची फसवणूक झाली.
-सुनील सपकाळे, रुग्णाचे नातेवाईक
शस्त्रकियेचेच पॅकेज ठरलेले होते. त्यात प्लास्टीक सर्जरीचा समावेश नव्हता. रुग्णाचे नातेवाईक खोटे बोलत आहेत. जिल्हा रुग्णालयात रुग्णास पाठविण्याचेही मी बोललो नाही.
-डॉ.राजेंद्र अग्रवाल