भडगाव तालुक्यावर दुष्काळाचे सावट दाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:44 AM2018-10-06T00:44:34+5:302018-10-06T00:46:39+5:30
यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने भडगाव तालुक्यात दुष्काळाचे दाट सावट निर्माण झाले आहे. खरीप हंगाम हातातून गेल्याने अंतिम पीक पैसेवारी ५० पैशाच्या आत लावण्यासह तालुका पाणीटंचाईच्या वाटेवर असल्याने प्रशासनाने नियोजन करण्याची मागणी केली जात आहे.
भडगाव : तालुक्यावर दुष्काळाचे घोंघावणारे सावट दाट झाले असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. तालुका आताच पाणी टंचाईच्या वाटेवर वाटचाल करू लागला असून यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाती काहीही उत्पन्न पडणार नसल्याने अंतिम पैसेवारी ५० पैशांच्या आत लावून तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
यंदा संपूर्ण गिरणा पट्ट्यात पावसाअभावी दुष्काळाची काळी छाया पसरू लागल्याने सर्वांचेच तोंडचे पाणी पळाले आहे. खरीप हंगाम तर वाया गेलाच परंतु पावसाळ्याची स्थिती जेमतेम सुद्धा न राहिल्याने नदी, नाले, पाझर तलाव बहुतांश कोरडे पडले आहेत, तर विहीरींनी आताच तळ गाठला आहे. परतीच्या पावसाची देखील आशा मावळल्यात जमा आहे.
दरम्यान, भङगाव तालुक्यात फक्त ४०९ मि. मी. म्हणजे सरासरीच्या ६१ टक्के पाऊस बरसल्याची महसूल प्रशासनाने नोंद केली आहे. तालुक्यात चारही महसूल मंडळात महसूल विभागाने पावसाची केलेली ही नोंद परिस्थितीच्या विपरीत असल्याचे जाणकारांमध्ये बोलले जात आहे. पावसाअभावी पिके वाया गेलेली असून आताच पाणी टंचाई उग्ररुप धारण करीत आहे. जेथे पिण्याच्या पाण्याचेच वांधे होणार आहेत, तेथे रब्बी हंगामाची तर काडीमात्रही शाश्वती उरलेली नाही. दरम्यान, प्रशासनाने प्रथम पीक नजर पैसेवारी ५० पैशाच्या आत लावली असून अंतीम पैसेवारी ५० पैशाचे आत लावावी, आणि प्रशासनाने भङगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष दयावे, प्रशासनाने पाणी टंचाई रोखण्यासाठी आतापासूनची पावले उचलावी. अशी रास्त मागणी भङगाव तालुक्यातील नागरीक व शेतकरी वर्गातून होतांना दिसत आहे.
खरीप हंगाम निम्याने घटला
या वर्षी तालुक्यात फारसा पाऊस झाला नाही. मात्र तो वेळेवर बरसल्याने पेरण्याही चांगल्या झाल्या. पिकेही कधी जोमात तर कधी कोमात अशी स्थिती राहिली. पावसाच्या बरसण्याच्या कमी अधिक चालीवर पिके वाढत, वाचत होती. अशात जोमात आलेल्या पिकांना दोन पावसांची गरज होती, मात्र तो गायब झाल्याने त्याचा फटका पिकांना बसला आणि खरीप हंगाम निम्याने घटल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शेतीत टाकलेला पैसा वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापङला आहे. त्यात जी काही पिके आली होती. त्या मालाला भावदेखील मिळत नसल्याने शेतकरी भरडला गेला आहे. त्यात शेतमजुरीचे वाढलेल्या दरामुळे शेती व्यवसायच धोक्यात आला आहे.
पाणी टंचाईवर प्रशासनाने नियोजन करावे
यंदा पाणी टंचाई वाढण्याची चिंता सतावत आहे. नागरीकांसह मुक्या जनावरांचाही पाणी प्रश्न गंभीर बनण्याचे संकेत मिळत आहेत. गावागावात पिण्याचे पाणी पुरवठा करणाºया विहीरी आतापासूनच तळ गाठत आहेत. पाझर तलाव, नदी कोरडी आहे. गिरणा धरणानेही चांगला पाऊस न बरसल्याने केवळ पन्नाशीच गाठली आहे. त्यामुळे गिरणाकाठावरच्या जनतेचा फक्त पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास हातभार लागणार आहे. त्यामुळे आता सध्या गिरणा नदीला पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरीत आहे.
रब्बीच्या आशेवर फिरणार पाणी
भङगाव तालुक्यात पावसाळा चांगला न झाल्याने खरीप हंगाम कसाबसा निघाला. नंतर मात्र पावसाची कमतरता अन जमीनीतील ओल विहीरींची खालावलेली पाणी पातळी यामुळे त्या आताच आटू लागल्या असून पिकांना पाणी देतांना त्या टप्पा घेत आहेत. पुढे काय स्थिती राहील ही शेतकºयांना चिंता वाटत आहे. तालुक्यात केटी वेअर व ३१ पाझर तलावापैकी ४० टक्के पाझर तलाव कोरङे पङलेले आहेत. तर उर्वरीत पाझर तलावात सरासरी १० ते १५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. सद्या आॅक्टोबर हीटमुळे पाण्याचे बाष्पीभवन जोरात होत असून ज्याच्यामध्ये जेमतेम पाणी आहे, ते पाझर तलावदेखील कोरडे पङण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे पाणी टंचाईचा फटका यंदा रब्बी हंगामाला बसणार असून रब्बीच्या पेरणीतही मोठी घट निर्माण होण्याची शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे. केळी, ऊस, मोसंबी, लिंबु, यासह बागायती पिकांनाही फटका बसण्याची शेतकºयांना मोठी धास्ती वाटू लागली आहे.