चाळीसगावच्या दिंडीचे पंढरीच्या वाटेवर प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 04:37 PM2019-06-17T16:37:21+5:302019-06-17T16:42:16+5:30
गेल्या ३० वर्षांपासून बेलदारवाडीच्या सिद्धेश्वर आश्रम ते पंढरपूर पायी जाणाऱ्या दिंडीने यंदाही सोमवारी सकाळी १० वाजता गावक-यांना वेशीवर प्रेमालिंग देत पंढरीकडे आगेकूच केली. यावेळी वारकरी आणि गावकरी यांना अश्रू अनावर झाले होते.
जिजाबराव वाघ
चाळीसगाव, जि.जळगाव : गेल्या ३० वर्षांपासून बेलदारवाडीच्या सिद्धेश्वर आश्रम ते पंढरपूर पायी जाणाऱ्या दिंडीने यंदाही सोमवारी सकाळी १० वाजता गावक-यांना वेशीवर प्रेमालिंग देत पंढरीकडे आगेकूच केली. यावेळी वारकरी आणि गावकरी यांना अश्रू अनावर झाले होते. मोठ्या भक्तीभावाने गावकऱ्यांनी दिंडीत सहभागी ३०० महिला व २०० पुरुष अशा ५०० वारकºयांना निरोप दिला.
ज्ञानेश्वर माऊली यांच्या नेतृत्वाखाली निघणाºया दिंडीचे हे यंदाचे ३१वे वर्ष आहे. चाळीसगाव शहरातून गेल्या ७९ वषार्पासून निघणाºया कै.हभप मोतीराम महाराज यांच्या पायी दिंडीचे प्रस्थान मंगळवारी बलराम व्यायाम शाळेच्या पटांगणावरुन होणार आहे. गतवर्षाप्रमाणे यावषीर्ही दिंडीत ४० विद्यार्थ्यांसह एकूण ८५ वारकरी सहभागी होणार असल्याचे दिंडीचे प्रमुख हभप कृष्णा महाराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सिद्धेश्वर आश्रमात गेल्या १५ दिवसांपासून दिंडीचे नियोजन करण्यात येत होते. परिसरातील बहुतांशी वारकरी रविवारीच मुक्कामी सिद्धेश्वर आश्रमात पोहचले.
सोमवारी पहाटेपासूनच आश्रमात वारकºयांची लगबग सुरू झाली होती. ज्ञानोबा - माऊलीचा गजरही सुरु होता. सर्व तयारी झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली यांनी वारकºयांना मार्गदर्शन केले. यावेळी बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील, युवा उद्योजक मंगेश चव्हाण, किशोर पाटील ढोमणेकर, भूषण पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते. टाळ - मृदुंगाचा गजर आणि मुखी हरिनाम घेत
पायी दिंडी खडकी बुद्रूक, तांबोळे, बोलठाण मार्गे २२ दिवसांचा पायी प्रवास करून पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी पोहचणार आहेत. दिंडीच्या अग्रभागी पालखी असून यावर्षी पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता जलसाक्षतेवर दिंडी मार्गात प्रबोधन करण्यात येणार आहे. गेल्या काही वषार्पासून सामाजिक दायित्व म्हणून दिंडी मार्गात येणाºया गावातील ग्रामस्थांना उदबोधन केले जाते.
यंदाचा दुष्काळ भयावह असून पाणीटंचाईची दाह मोठा आहे. दिंडीत यावरच प्रबोधन करुन झाडे लावण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. विठूरायाला दुष्काळाच्या आरिष्टातून महाराष्ट्र मुक्त होऊ दे, असे साकडे घालणार असल्याचे हभप ज्ञानेश्वर माऊली यांनी सांगितले.
४० विद्यार्थी विठूनामाच्या शाळेत !
‘विठ्ठल नामाची शाळा भरली... शाळा शिकताना तहान-भूक हरली...’ असं म्हणत चाळीसगावहून मंगळवारी पंढरपुरकडे प्रस्थान करणाºया कृष्णा महाराज यांच्या पायी दिंडीत यावर्षीदेखील ४० विद्यार्थी सहभागी होत आहे. गेल्या चार वर्षांपासून कृष्णा महाराज यांनी आपल्या शिवाजी चौकातील घरातच पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना आश्रय दिला आहे. यातील बहुतांशी विद्यार्थी आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील आहे. या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत वारकरी शिक्षणही दिले जाते. दरवर्षी तिसहून अधिक विद्यार्थी पंढरपुरची वारी करतात. यंदा हे दिंडीचे ८० वे वर्ष आहे. गेल्यावर्षी ४५ विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते.