समस्यांच्या पावसासाठी आरोग्य विभाग सक्षम आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 05:11 PM2019-08-11T17:11:24+5:302019-08-11T17:12:17+5:30
आनंद सुरवाडे सर्वत्र समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. धरणांची पातळी समाधानकारक आहे, मात्र, शहरात, गावांमध्ये झालेल्या रिमझीम पावसामुळे साचलेले डबके, ...
आनंद सुरवाडे
सर्वत्र समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. धरणांची पातळी समाधानकारक आहे, मात्र, शहरात, गावांमध्ये झालेल्या रिमझीम पावसामुळे साचलेले डबके, तुंबलेल्या गटारी, तुंबलेले नाले, स्वच्छतेचा अभाव या सर्व बाबी आगामी काळात आरोग्याच्या समस्यांना मोठ्या प्रमाणावर निमंत्रण देणाऱ्या आहेत़ ज्या वेगोन या समस्या उदभवण्याची शक्यता आहे, त्यावेगाने आरोग्य विभागाच्या मात्र कुठल्याही उपाययोजना नाहीत़ त्यामुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आता सक्षम आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे़
पावसामुळे सर्वत्र छोटे मोठे डबके साचलेले आहेत़ हे डबके डासांना पोसणारे असतात, स्वच्छता नसल्याने सहाजिकच रोगराईला आमंत्रण मिळते़ पावसाळा सुरू असतानाच भुसावळात दोन डेंग्यूचे रूग्ण आढळल्याचे वृत्त आले़ आगामी काळात ही स्थिती अधिकच गंभीर होणार आहे़ ज्या आरोग्य यंत्रणेवर जिल्ह्याची आरोग्य सेवा अवलंबून आहे त्या जिल्हा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दोन -दोन तीन - तीन महिने पगार होत नसल्याने या विभागाचेच आरोग्य सध्या बिघडल्यात जमा आहे़ नवीन जिल्हा आरोग्य अधिकारी यायला तयार नसून गेल्या दोन महिन्यांपासून प्रभारी कारभार सुरू आहे़ कर्मचाºयांना वेतन नसल्याने त्यांचे मनोबल खचल्याचे सांगण्यात येते़ सर्वात जास्त प्रलंबित फाईली या विभागात राहत असल्याच्या वरिष्ठांच्या तक्रारी आहेत़ जिल्हाभरातील आरोग्य केंद्रात ९४ जागा रिक्त पडल्या आहेत़ बºयाच आरोग्य केंद्राना डॉक्टर मिळत नाही, ही डगमगलेली सेवा सावरण्यातच आरोग्य विभागाचे अर्धे श्रम जात आहेत, त्यामुळे आता पावसामुळे जिल्हाभरात उद्भवणाºया आरोग्याच्या समस्या सावरण्यात यंत्रणा पुरेसी पडेल का? असा प्रश्न तर आहेच मात्र, जर अशा समस्या आता उद्भवणार आहे, हे उघड असताना आतापासूनच उपायायोजनांना व जनजागृतीला सुरूवात का होत नाही? शासकीय कागदांचे खेळ खेळण्यापेक्षा थेट लोकांमध्ये जावून समस्या थांबवायला यंत्रणा नेहमी कमी का पडत असत? या प्रश्नाचे उत्तर शोधल्यास बºयाच अडचणींवर मात करता येणे शक्य होणार आहे़ चांगल्या अधिकाºयांना टिकू दिले जात नाही, हा जो आरोप होतो तो सामान्य व आरोग्य यंत्रणा यातील दुरावा अधिक वाढविणारा आहे़ नवीन अधिकारी यायला या ठिकाणी धजावत नाही, हा स्थानिक प्रशासनाने आत्मपरिक्षण करण्याचा विषय आहे़ जनजागृतीसाठी कोट्यवधींवर खर्च होतो मात्र तरीही दर वर्षी पुन्हा त्याच विषयावर जागृतीसाठी मोहीम हाती घ्यावीच लागते हे यंत्रणेचे अपयश म्हणावे का? डेंग्यू, मलेरिया, टाईफार्ईड, डायरिया या आजारांचे थैमान सुरू होण्याआधी ते आता थांबविणे आरोग्य विभागाच्या हाती आहे किंवा नाही़?
आरोग्य विभागाच्या बाबतीत आधिच सामन्यांच्या मनात असंतोष आहे, तो दूर करण्यास हा विभाग वारंवार कमी पडला आहे़ चांगले अधिकारी येतात मात्र, राजकीय अडथळ्यांमुळे ते चांगल्या सेवा देऊ शकत नाही, किंवा अधिकारीच उदासीन असतात व आरोग्य सेवा कोलमडते अशातच हा आरोग्य विभाग गुरफटून पडला आहे़ एक लिपीक काम करीत नाही म्हणून सर्व कर्मचाºयांचे पगारच होत नाही, अशी पर्यायी व्यवस्था नसलेली ही यंत्रणा आता पावसानंतर उद्भवणाºया समस्यांचा सामना करायला सक्षम आहे का?
त्यामुळे नागरिकांनी काहीबाबींवर स्वत:च काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल़ स्वच्छता राखणे, डबके साचू न देणे, मच्छरांना पोषक वातावरण निर्माण होऊ न देणे, कोरडा दिवस पाळणे, कचºयाची वेगवेगळा करून योग्य विल्हेवाट लावणे, पाणी उकळून पिणे, लहान बालके व वृद्धांची अधिक काळजी घेणे, मच्छरांपासून बचावात्मक उपाययोजना करणे याबाबी पाळाव्यात जेणे करून आरोग्य विभागावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही़