मोहाडीत लवकरच शस्त्रक्रिया विभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:15 AM2021-05-23T04:15:43+5:302021-05-23T04:15:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मोहाडी येथील महिला रुग्णालयात कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी आयुर्वेद महाविद्यालयाचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मोहाडी येथील महिला रुग्णालयात कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी आयुर्वेद महाविद्यालयाचा तसेच जिल्हा रुग्णालयात स्टाफ कार्यरत असून उपचारपद्धतीचे एक चांगले उदाहरण या डॉक्टरांनी या ठिकाणी ठेवले आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून कोरानाला थोपविण्यासाठीचे स्मार्ट नियोजन कसे असावे, याची प्रचिती येते. लवकरच या ठिकाणी शस्त्रक्रिया विभाग सुरू होणार आहे.
हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे काम या ठिकाणी सुरू होणार आहे. यामुळे ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा मुद्दाही बऱ्याच अंशी निकाली निघणार आहे. याठिकाणी डॉक्टरांच्या तीन सत्रात ड्युटी लावण्यात आल्या आहेत. यासह डॉ. सुपे यांच्याकडे अधीक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पोस्ट कोविड ओपीडीही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, समाजातील विविध घटकांनी या रुग्णालयासाठी हात भार लावला असून सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी दूरध्वनी या रुग्णालयाला दिला आहे. त्यातून संपर्क करणे सोपे झाले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा ड्रीम प्रोजेक्ट
मोहाडी येथे शंभर खाटांच्या महिला रुग्णालयाचे नियोजन करण्यात आले होते. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता. यातील अर्धी इमारत ही अखेर कोविड हॉस्पिटलसाठी तयार करण्यात आली. यात तातडीने ओटू पाईपलाईनचे काम करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सातत्याने पाठपुरावा करून अखेर या ठिकाणी रुग्णांना दाखल केले. या रुग्णालयात केवळ औषधोपचार नव्हे तर योगासनांचे वर्ग घेतले जातात, प्राणायाम, समुपदेशनाचे वर्ग घेतले जातात. रुग्णांशी नियमीत संवाद साधला जातो.
काय हवे
१ विविध सामाजिक संस्थांनी प्रशासनाला अशाप्रकारे आरोग्य सेवेत तालुकास्तरावर मदत केल्यास एक चांगले रुग्णालय उभे राहून बेडचा मुद्दा, योग्य उपचार, यातून कोविडला थोपविणे शक्य होणार आहे.
२ संस्थांनी केवळ देणगीसोबतच यात थोडा वेळ दिल्यास अशा प्रकारचे एक उत्तम उदाहरण उभे राहू शकते. तिसऱ्या लाटेसाठी ते अत्यावश्यक आहे.
३ गरजू, सेवा देण्यास इच्छुक तरूणांना कक्षसेवक म्हणून नियुक्त करून सेवाभावही जोपासला जाईल त्यांच्या रोजगाराचा प्रश्नही सुटेल, मनुष्यबळाचा मुद्दाही निकाली निघेल.
तिसऱ्या लाटेसाठी नियोजन
तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढण्याच्या दृष्टीकोणातून या ठिकाणी वाढीव ८०० बेडचे नियेाजन करण्यात आले आहेत. यात ५० बेड हे बालकांसाठी राखीव राहणार आहेत. त्याचे साहित्यही या ठिकाणी आणण्यात आले आहेत.
कोट
रुग्ण समाधानाने व आनंदाने या ठिकाणाहून डिस्चार्ज होऊन जातात. डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ यांचे सर्वांचे परिश्रम , सेवाभावी संस्थांची मदत यातून या ठिकाणी एक चांगले रुग्णालय सुरू आहे. आगामी काळात या ठिकाणी आता शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे. जागा व मनुष्यबळ असल्याने त्याचे लवकर नियोजन होणार आहे. - डॉ. यु. बी. तासखडेकर, नोडल अधिकारी