विठ्ठलनामाच्या जयघोषात अमळनेरच्या दिंडीचे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 06:01 PM2018-06-29T18:01:45+5:302018-06-29T18:05:01+5:30
पाऊले चालती पंढरीची वाट : २१ जुलै रोजी दिंडी पंढरपुरात पोहोचणार
अमळनेर, जि.जळगाव : संत सखाराम महाराजांचा जयजयकार, विठ्ठल नामाचा जयघोष करीत संत सखाराम महाराज विठ्ठल-रुख्मिणी संस्थानच्या दिंडीचे शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता तुळशी बागेतून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी भाविकांचा उत्साह अमाप होता.
वारीत सहभागी होण्यासाठी भाविकांची सकाळपासूनच वाडी संस्थानमध्ये गर्दी होऊ लागली होती. पहाटेपासूनच वाडीत टाळमृदुंगाचा आवाज निनादू लागला होता. सकाळी प्रसाद महाराजांचे वाडीत विठ्ठलासमोर कीर्तन झाले. त्यानंतर समाधीचे दर्शन घेतल्यानंतर प्रसाद महाराज पैलाडमधील तुळशी बागेत आले. या ठिकाणी महाराजांच्या हस्ते तुळशीपत्र अर्पण करण्यात आले.
पूजा आटोपल्यानंतर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. भाविकांसाठी येथे शामियाना टाकण्यात आला होता. ओसरीवर बसून महाराज भाविकांना खडीसाखरेचा प्रसाद व आशीर्वाद देत होते. दिंडी निघण्याची वेळ समीप येत होती. तसतशी भाविकांची गर्दी वाढू लागली होती.
दुपारी ठीक १२.३० वाजता आरती झाली. प्रसाद महाराजांनी भाविकांना आशीर्वाद देताच भाविकांनी संत सखाराम महाराज की जय असा जयघोष केला. महाराजांनी डोक्यावर पांढरी घोंगडी घेतली अन् महाराज व वारकरी पंढरपूरकडे रवाना झाले. दिंडीत शेकडो भाविक सहभागी झाले होते.
२३ दिवसांचा प्रवास केल्यानंतर अमळनेरची पायी दिंडी शनिवार, २१ जुलै रोजी पंढरपूरला पोहचेल.
दिंडीचा पहिला मुक्काम पारोळ्याला आहे. तेथून आडगाव, भडगाव, नगरदेवळा, नेरी, नागद, बिलखेडा, नागापूर, पिशोर, चिखलठाण, टाकळी, दौलताबाद, वाळूंज, महारूळ, पैठण, शेवगांव, पाथर्डी, धामणगांव, कडा, आष्टी, अरणगांव, जवळा, करमाळा, निंभोरा, वडशिवणे, सापटणे, करकंबमार्गे २१ जुलैला पंढरपुरात दाखल होईल.
या वेळी महेश कोठावदे, राजू महाले, विजय प्रभाकर पाटील, पवार, बी.आर.बोरसे, पी.एस.कुलकर्णी, संदीप मल्हारी पाटील, मोतीलाल अहिरे, पवन शेटे, गोपी कासार, सुरेश पिरन पाटील, उमेश देशमुख, राजकुमार बित्राई, विठोबा महाजन, अजबराव पाटील, रघू कंखरे, बापू झुलाल, अॅड.लाठी, नितीन निळे, कमल दलाल, विजय शुक्ल, प्रांत संजय गायकवाड, दिनेश सोनवणे, उदय देशपांडे, संजय एकतारे आदी उपस्थित होते.