जळगाव: संत मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम सातोड गावी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 01:41 PM2022-06-03T13:41:30+5:302022-06-03T13:42:10+5:30
मानाचा समजला जाणारा हा पालखी सोहळा सर्वात लांब तब्बल ७०० किमीचा पायी प्रवास ३३ दिवसात पूर्ण करेल.
मुक्ताईनगर जि.जळगाव : पुंडलिक वरदे हरि विठ्ठल..... श्री ज्ञानदेव तुकाराम.....आदी शक्ती मुक्ताईच्या जय घोषात संत मुक्ताबाई आषाढी पालखी सोहळ्याने श्रीक्षेत्र कोथळी येथून शुक्रवारी दुपारी १२ वाजता पंढरपूर कडे प्रस्थान केले. पालखीचा पहिला मुक्काम सातोड गावी होणार आहे.
मानाचा समजला जाणारा हा पालखी सोहळा सर्वात लांब तब्बल ७०० किमीचा पायी प्रवास ३३ दिवसात पूर्ण करेल. तत्पूर्वी सकाळपासून कोथळी येथील मुक्ताई मंदिरावर वारकरी भाविकांची मांदियाळी जमली होती. टाळ मृदंगाच्या गजर आणि मुक्ताईचा जयघोष सुरू होता. सकाळी ११.४५ वाजता मुक्ताईची आरती करण्यात आली.
संस्थानचे अध्यक्ष अॕड. रवींद्र पाटील यांच्याहस्ते मुक्ताई पादुका पालखीत आरूढ करण्यात आल्या. पुंडलिक वरदे हरे विठ्ठलच्या गजरात आमदार चंद्रकांत पाटील खासदार रक्षा खडसे, रोहिणी खडसे, खंडवा येथील खासदार ज्ञानेश्वर महाजन, म.प्र. च्या माजी मंत्री अर्चना चिटणीस, संदीप पाटील, पंजाबराव पाटी यांनी पादुका पालखी खांद्यावर घेतली आणि पायी वारीस सुरुवात झाली.