हद्दपार केलेला गुन्हेगार सापडला कंपनीत झोपलेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:12 AM2021-06-28T04:12:58+5:302021-06-28T04:12:58+5:30
फोटो क्र.२७ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केलेला राहुल रामचंद्र बऱ्हाटे (वय २७, रा. रामेश्वर ...
फोटो क्र.२७
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केलेला राहुल रामचंद्र बऱ्हाटे (वय २७, रा. रामेश्वर कॉलनी) हा मध्यरात्री एमआयडीसीतील आर. बी. पॉलिमर या कंपनीत झोपलेला मिळून आला. त्याला पोलिसांनी अटक केली असून हद्दपार आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर असलेला राहुल बऱ्हाटे व गोलू ऊर्फ दत्तू नारायण चौधरी (वय २६, रा. तुकारामवाडी) हे सराईत गुन्हेगार असून पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ प्रमाणे २७ मे रोजी दोघांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. दरम्यान, राहुल हा हद्दपार असतानाही एमआयडीसीतील आर. बी. पॉलिमर या कंपनीत झोपला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी रात्रीच्या गस्तीवर असलेले उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सुधीर साळवे, सचिन मुंढे, इम्रान सय्यद, गोविंदा पाटील, किशोर पाटील, हेमंत कळसकर व चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने मध्यरात्री १ वाजता कंपनीत जाऊन तपासणी केली असता, तो एका खोलीत झोपलेला आढळून आला. त्याला लागलीच अटक करण्यात आली आहे. हद्दपारीनंतर दोघांना पोलिसांनी धुळे येथे सोडले होते.