एनएमएमएस शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 09:42 PM2019-11-27T21:42:41+5:302019-11-27T21:42:50+5:30
जळगाव : आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण थांबू नये म्हणून शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ...
जळगाव : आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षण थांबू नये म्हणून शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) दिली जाते. मात्र, सन २०१३ पासून शेकडो विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नसल्याची बाब समोर आली असून अनेक पालकांनी याबाबत शिक्षण विभागात तक्रार केली आहे़
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत आठवीसाठी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत असते़ मात्र, सन २०१३ पासून बहुतांश विद्यार्थ्यांना अजूनही शिष्यवृत्तीच्या लाभाची प्रतीक्षा लागून आहे़ दुसरीकडे अनिल सोनवणे यांच्यासह काही पालकांनी नुकतीच माध्यमिक शिक्षण विभागात येवून दोन वर्षांपासून आपल्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याची तक्रार केली आहे़ एवढेच नव्हे तर काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे तीन ते चार हप्ता मिळाल्यानंतर शिष्यवृत्तीचं मिळालेली नाही़ म्हणजेच उच्च शिक्षण थांबू नये यासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती मिळत नसल्यामुळे गोरगरिब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून देखील वंचित राहण्याची वेळ नाकारता येत नाही़
विद्यार्थ्यांची पाठविली माहिती
पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर माध्यमिक शिक्षण विभागाकडून शासनाला ती तक्रार कळविण्यात आली आहे़ त्यानुसार शासनाकडून विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाइन आणि आॅनलाइन पध्दतीने पाठविण्याच्या सूचना केल्या़ त्यानुसार दहावी, अकरावी व बारावीच्या ७४९ विद्यार्थ्यांची आॅनलाइन माहिती सादर करण्यात आली असून नववी, दहावी, अकरावी आणि बारावी अशा काही ८१५ विद्यार्थ्यांची पुणे येथे आॅफलाइन पध्दतीने माहितीने पाठविण्यात आली आहे़
काय आहे योजना
आर्थिकदुष्टया दुर्बल घटकातील या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाला हातभार लागावा म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता आठवीत असताना विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येत असते़ त्यानंतर इयत्ता नववीपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लाभ मिळतो़ अर्थात योजनेत नववी ते बारावीपर्यंतच्या पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. म्हणजेचं दरमहा १ हजार रूपये दिले जाते़ सलग चार वर्षे ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्याला मिळते.