पोलीस दलाचे खच्चीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:23 PM2019-01-05T12:23:19+5:302019-01-05T12:24:54+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांना चाप लावला. त्यानंतर धंद्याशी संंबंधित अधिका-यांची उचलबांगडी करुन अकार्यकारी पदावर नियुक्ती केली तर खास जबाबदारी असलेल्या ८० पोलिसांना एक महिन्याचा नवचैतन्य कोर्स सक्तीचा केला. या कारवायांमधून जिल्हा पोलीस अधीक्षकांची प्रतिमा सामान्य जनतेत उंचावली. इतकेच काय ८० टक्के कर्मचारी देखील एस.पींच्या निर्णयाने खूश होते. तीन महिन्यात उंचावलेली प्रतिमा थर्टी फर्स्टच्या एका रात्रीतून मलीन झाली.
सुनील पाटील
जळगाव : जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांना चाप लावला. त्यानंतर धंद्याशी संंबंधित अधिका-यांची उचलबांगडी करुन अकार्यकारी पदावर नियुक्ती केली तर खास जबाबदारी असलेल्या ८० पोलिसांना एक महिन्याचा नवचैतन्य कोर्स सक्तीचा केला. या कारवायांमधून जिल्हा पोलीस अधीक्षकांची प्रतिमा सामान्य जनतेत उंचावली. इतकेच काय ८० टक्के कर्मचारी देखील एस.पींच्या निर्णयाने खूश होते. तीन महिन्यात उंचावलेली प्रतिमा थर्टी फर्स्टच्या एका रात्रीतून मलीन झाली.
माजी महापौर ललीत कोल्हे यांच्या ममुराबाद शिवारातील कोल्हे फार्महाऊस झालेली ‘डर्टी पार्टी’ सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी उधळून लावत. छय्या छय्या करणा-या सहा नर्तीकांसह १८पुरुषांना ताब्यात घेतले. या कारवाईत राजकीय दबाव प्रचंड वाढल्याने काही जणांना जागेवरच सोडून देण्यात आले तर दुस-या दिवशी गुन्हा दाखल न करता केवळ प्रतिबंधक कारवायांवर प्रकरण मिटविण्यात आले. अधिका-यांची इच्छा नसताना त्यांना राजकीय दबावाला सामोरे जावे लागले. ही वस्तू स्थिती असली तरी पोलिसांनी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता कारवाई करुन मोकळे व्हायला हवे होते. परंतु तसे झाले नाही आणि तेथेच ‘खाकी’ च्या प्रतिमेला धक्का बसला. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पोलीस दलाविषयी नाराजी उमटू लागली. दुसरीकडे काम करणा-या अधिका-यांचेही खच्चीकरण झाले. अवैध धंद्याचे समर्थन कुणी करणारच नाही, मात्र किरकोळ गावठी दारु विक्रेते, हातगाडीवर मद्य प्राशन करणा-यांना कोठडीत टाकतात. दारु विक्रेत्यांच्या घरांची झडती घेतली जाते, मग येथे तर दारुचा मोठा साठाच होता, कारवाईत त्याचा साधा उल्लेखही नाही. इतकेच काय पार्टीच स्थळही बदलण्यात आले. ‘गरीब की बीवी सबकी भाभी’ .... या म्हणीचा प्रत्यय या कारवाईतून आला आहे. सामान्यांवर तर कोणीही कारवाई करते, त्याची फारशी चर्चाही होत नाही. बड्या धेंड्यावर कारवाईचीच चर्चा होते. कोल्हे यांच्या फार्महाऊसवरील डर्टी पार्टी शी संबंधित लोकांवर पोलिसांनी प्रामाणिकपणे कारवाई केली असती तर ख-या अर्थाने पोलीस अधीक्षक व सहायक पोलीस अधीक्षक सिंघम झाले असते.