सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी औरंगाबादला उपमहाव्यवस्थापकांची घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 04:30 PM2020-11-20T16:30:35+5:302020-11-20T16:33:34+5:30
कापसाचे घटते उत्पादन हातात येवूनही शासनाच्या आधारभूत किमतीला हरताळ फासून व्यापारी वर्गाकडून कमी भावात खरेदी होत नाही.
रावेर : कापसाचे घटते उत्पादन हातात येवूनही शासनाच्या आधारभूत किमतीला हरताळ फासून व्यापारी वर्गाकडून कमी भावात खरेदी होत नाही. यामुळे घाट्याचा सौदा करण्यापेक्षा रावेरला तातडीने भारतीय कापूस महापरिषदेचे (सी.सी.आय) च्या माध्यमातून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन भारतीय कापूस महापरिषदेचे उपमहाव्यवस्थापक अर्जुन दवे यांची रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मागणी केली.
गतवर्षीच्या कापूस पणन महामंडळाच्या कापूस खरेदी केंद्रावर सुरूवातीपासून अखेरपावेतो ग्रेडरअभावी रावेर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस पूर्णपणे खरेदी न झाल्याने शेतकरी बांधवांचे कमालीचे नुकसान झाले. किंबहुना, यंदाही भारतीय कापूस महापरिषदेचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत घोषणा होऊन दिवाळीसारखा सण लोटल्यानंतरही कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने खासगी व्यापारी वर्गाने केंद्र सरकारच्या आधारभूत किमतीला हरताळ फासत जादा नफेखोरीसाठी कमी भावात कापूस खरेदी केली. शेतकर्यांच्या या आर्थिक नुकसानीचे गांभीर्य पाहता रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीकांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ संचालक राजीव पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, नीळकंठ चौधरी व सचिव गोपाळ महाजन यांच्या शिष्टमंडळाने थेट औरंगाबाद येथील भारतीय कापूस महापरिषदेचे उपमहाव्यवस्थापक अर्जुन दवे यांची समक्ष भेट घेऊन त्यांना आर्थिक अडगळीत अडकलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा सांगून तातडीने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
तत्पूर्वी खासदार रक्षा खडसे व आमदार शिरीष चौधरी यांनीही तगादा लावला असल्याची यावेळी पुष्टी मिळाली. कापूस महापरिषदेचे उपमहाव्यवस्थापक अर्जुन दवे यांनी कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याबाबत आश्वस्त केल्याची माहिती सभापती श्रीकांत महाजन यांनी दिली.