उपमहापौरांचा उद्या जनता दरबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:17 AM2021-01-20T04:17:03+5:302021-01-20T04:17:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, अनेकदा नागरिक पदाधिकाऱ्यांपर्यंत आपल्या समस्या पोहचवू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, अनेकदा नागरिक पदाधिकाऱ्यांपर्यंत आपल्या समस्या पोहचवू शकत नाहीत. त्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचविता याव्यात म्हणून गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत महानगरपालिकेच्या आवारात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमहापौर सुनील खडके यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नगरसेविका ॲड.शुचिता हाडा, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, अमित काळे, मनोज अहुजा, मनोज काळे आदी उपस्थित होते. उपमहापौरांनी यावेळी सांगितले की, उपमहापौर आपल्या दारी या उपक्रमातुन नागरिकांनी मांडलेल्या समस्या तत्काळ सोडविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अनेक नागरिकांची भेटी या दरम्यान होवू शकल्या नाहीत. अनेकजण मनपात आपल्या समस्या घेवून येतात. अनेकवेळा या समस्या व तक्रारींना फारसा प्रतीसाद अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून मिळत नाही म्हणून अधिकाऱ्यांचा उपस्थितीतच जनता दरबार घेवून, नागरिकांच्या समस्या ऐकूण घेतल्या जाणार आहेत. तसेच या समस्या तत्काळ सोडविण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती उपमहापौरांनी दिली. उपमहापौरांचा जनता दरबार हा महिनाभर चालणार असून, प्रत्येक गुरुवारी सकाळी ११ वाजता मनपाच्या आवारातच हा दरबार भरविला जाणार आहे.
अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा
उपमहापौरांनी मंगळवारी दुपारी ४ वाजता मनपातील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी शहरातील सर्व विकासकामांच्या स्थितीचा आढावा घेतला. अमृत, रस्ते, स्वच्छता यावर आढावा घेवून माहिती घेतली. तसेच गुरुवारी होणाऱ्या जनता दरबाराच्या वेळेस सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचा सूचना दिल्या आहेत.