भडगावच्या आधीच चाळीसगावला डेप्युटी आरटीओ कार्यालय मंजूर
By सुनील पाटील | Published: February 27, 2024 05:01 PM2024-02-27T17:01:42+5:302024-02-27T17:02:01+5:30
जळगावचे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्याकडेच या कार्यालयाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.
जळगाव : जळगावला प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय (आरटीओ) निर्माण झाल्यानंतर आता चाळीसगावला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (डेप्युटी आरटीओ) कार्यालय मंजूर झाले असून त्याची अधिसूचना राज्य शासनाने काढली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कार्यालय कार्यान्वित होणार असून जळगावचे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्याकडेच या कार्यालयाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. भडगावचा प्रस्ताव आधी असतानाच चाळीसगावला कार्यालय मंजूर झालेले आहे.
सध्या या कार्यालयासाठी भाडे तत्वावर जागा घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. नवीन पदांची निर्मिती होईपर्यंत समायोजनाने पदे भरण्याच्या सूचना आहे. एक डेप्युटी आरटीओ, एक एआरटीओ, चार मोटार वाहन निरीक्षक, सहा दुय्यम मोटार वाहन निरीक्षक, पाच लिपिक व शिपाई आदी पदे शेजारच्या कार्यालयातून घेतले जाणार आहेत. जळगावला एआरटीओची सहा पदे मंजूर असून ती रिक्त आहेत. त्यामुळे नाशिक, मालेगाव व धुळे या कार्यालयातून पदे समायोजित केली जाण्याची शक्यता आहे.
एम.एच.५२ नवा नोंदणी क्रमांक
चाळीसगावसाठी एम.एच.५२ हा नवीन नोंदणी क्रमांक देण्यात आला आहे. त्याशिवाय एक इंटरसेप्टर वाहनालाही मंजुरी देण्यात आली आहे. कार्यालयासाठी लागणार खर्च व इतर खर्चाची अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद केली जाणार आहे. गृहविभागाचे अवर सचिव भरत लांघी यांनी याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे.