जेठाणीला कॉल करुन दिरानीने केली रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 22:19 IST2021-03-03T22:18:35+5:302021-03-03T22:19:10+5:30

दुर्घटना : पोलिसांनी बोलण्यात गुंतविण्यात ठेवले, पण आले अपयश

Derani committed suicide under the train by calling Jethani | जेठाणीला कॉल करुन दिरानीने केली रेल्वेखाली आत्महत्या

जेठाणीला कॉल करुन दिरानीने केली रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव : जीवनाला कंटाळली आहे, जीवाचे बरे वाईट करुन घेते असे जेठाणीला मोबाईलवर कॉल करुन दिरानीने धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी साडे बारा वाजता असोदा रेल्वेलाईनजवळ घडली. विमलबाई काशिनाथ चौधरी (वय ५५, रा.रामेश्‍वर कॉलनी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली हे उशिरापर्यंत स्पष्ट झालेले नव्हते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमलबाई चौधरी या पती काशिनाथ ओंकार चौधरी आणि मुलगा सचिन चौधरी यांच्यासोबत रामेश्‍वर कॉलनी येथे वास्तव्यास होत्या. बाजार समितीत भाजीपाला खरेदी करुन त्याच ठिकाणी भाजी विक्री करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होत्या. बुधवारी सकाळी ७ वाजता विमलबाई नेहमीप्रमाणे भाजीपाला विक्रीसाठी पती व मुलगा सचिन यांच्यासोबत बाजार समितीत गेल्या. दुपारी १२ वाजता पती तसेच मुलगा या दोघांपैकी कुणालाच काही एक न सांगता रिक्षाने त्या थेट असोदा रेल्वे गेटजवळ पोहचल्या. तेथून त्यांनी मोबाईलवरुन जेठाणी तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी शोभा चौधरी यांना कॉल केला, मी कंटाळली असून जीवाचे बरेवाईट करुन घेते असे सांगून कॉल कट केला.


पोलीस पोहचले पण...
दिरानी असोदा रेल्वे गेटजवळील रुळाजवळ आत्महत्या करायला निघाली आहे, तात्काळ त्यांना रोखा म्हणून शोभा चौधरी यांनी शनीपेठ पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांना कळविले. ससे यांनी चौधरी यांना विमलबाई यांना फोनवर बोलण्यात व्यस्त ठेवा, आम्ही घटनास्थळी पोहचतोच असे सांगून तेही तातडीने निघाले. त्यानुसार शोभा चौधरी यांनी पुन्हा दिरानीला कॉल करुन बोलण्यात गुंतविले, पण पोलीस पोहचण्याआधीच रेल्वे आली अन‌् तिच्यासमोर झोकून त्यांनी जीवन संपविले. पोलीस घटनास्थळावर पोहचल्यावर दृष्य पाहून आपणही जीव वाचवू शकलो नसल्याचे शल्य त्यांच्या मनात बोचत होते.
पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. घटनेची माहिती मिळाल्यावर विमलबाई यांचे पती व मुलगा रुग्णालयात पोहचले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास हवालदार विलास शिंदे करीत आहे.

Web Title: Derani committed suicide under the train by calling Jethani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.