गरजांनी हिरावून नेलं गावाचं सुख -समाधान : ओलावा आटतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 05:37 PM2018-10-29T17:37:06+5:302018-10-29T17:37:21+5:30

‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत ‘गाव पांढरी’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक रवींद्र पांढरे....

Desperate by the needs of the village, the happiness of the village: the moisture is complete | गरजांनी हिरावून नेलं गावाचं सुख -समाधान : ओलावा आटतोय

गरजांनी हिरावून नेलं गावाचं सुख -समाधान : ओलावा आटतोय

Next

धुणं धुवायला गृहिणी नदीवर निसर्गाच्या सान्निध्यात जायच्या. आता गरजा वाढल्या, हव्यास वाढला. गावाचं सुख समाधान पार हिरावून गेलं.
वीज आली आणि रॉकेलच्या दिव्यांनी टिमटिमणारं गाव विजेच्या दिव्यांनी झगमगायला लागलं. विजेच्या दिव्यांनी गावातल्या चांदण्याची रम्यता, शितलता, शांती पार विस्कटून गेली. वीजेमुळे खूप साऱ्या सुविधा आल्या पण त्या सोबत चंगळता सुद्धा आली. घरातलं जातं गेलं चक्की आली, पाटा वरवंटा गेला आणि मिक्सर आलं. झिरपणारा मातीच्या गार पाण्याचा माठ गेला आणि फ्रिज आलं. घरोघरी मातीच्या चुली ही म्हण कालबाह्य झाली आणि घरोघरी वीजेच्या/गॅसच्या शेगड्या ही नवीनच म्हण रुजू झाली. धुणं धुवायला गृहिणी नदीवर निसर्गाच्या सान्निध्यात जायच्या तर आता वॉशिंग मशीन आलं. गरजा वाढल्या, हव्यास वाढला. या गरजांंनी, हव्यासानं गावाचं सुख समाधान हिरावून गेलं. आधी खेड्याच्या गरजा सिमीत होत्या. मुळातच गरजा फारशा नसल्याने गरीबीतलं गावही सुखी समाधानी होतं.
पूरक मातीच्या धाब्याची घरं हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंडगार असत. या घरांमध्ये उन्हाळ्यात ही वीजेच्या पंंख्याशिवाय सुखाची गाढ झोप लागत असे. आता मातीच्या धाब्याच्या घरांच्या जागी आरसीसीची सिमेंटची घरं आली. या घरांमध्ये वीजेच्या पंख्याची हवा सुद्धा उन्हाच्या झळांसारखी गरम भासते. मग नुस्त्या पंख्यावर गरज भागत नाही, तर कुलर पाहिजे, एसी पाहिजे. सुविधा येताहेत पण सुख समाधान दूर पळतयं.
गावाच्या भवतीची शेती -बागायती जाऊन त्या जागी वाड्या, वस्त्या, नगरं, कॉलन्या उभ्या राहताहेत. गाव विस्तारतंय आणि रान आकसतयं. गरजपूर्तीसाठी माणूस झापडं लावलेल्या टांग्याच्या घोड्यासारखा धाव धाव धावतोयं. धावता धावताच धाप लागून कोलमडतोयं. झापडं लावलेली असल्याने सभोवतालच्या निसर्गाच्या ºहासाशी, ढासळणाºया मानवी मुल्यांशी त्याला जणू काही काहीच देणं घेणं उरलं नाहीये. जमिनीतून वर्षाकाठी एक पीक घेणारा माणूस आता वर्षाकाठी दोन-दोन कधी तर तीन-तीन पीकं घ्यायला लागला आहे. त्यामुळे भू-गर्भातील पाण्याची पातळी खोल-खोल जातेय. जमिनीतला ओलावा आटत चाललाय. नद्या, नाले, तलावं, धरणं पाण्यावाचून ओस पडताहेत, कधी काळी गावाच्या अर्ध्या अधिक गरजा भागविणारी जीवनदायीनी नदी आजच्या काळात पाण्यावाचून पार केविलवाणी झालीयं. किनाºया लगत नदीच्या पात्रातच माणसं घरं बांधताहेत. गावभरातून जमा झालेला केरकचरा थेट नदीच्या कोरड्या पात्रात आणून टाकला जातोयं. नदीचं पार ‘डम्पिंग ग्राऊंड’ झालयं. कधी काळची जीवनदायीनी नदी आताशा अभागिनी झालीयं.
बाहेर लांबून वीजेच्या दिव्यांंनी झगमगतांना दिसणारी गाव आतून मात्र पार कोलमडून पडली आहेत. आरसीसीच्या रंगीत घरात राहणारा, कुलरच्या गार हवेत विसावणारा गाव, चकचकीत डांबरी रस्ते झाले म्हणून मोटार सायकलवरून सुसाट धावणारा गाव, उन्हाळ्यात घोटभर पाण्यासाठी मात्र मैलोनमैल वणवणाताना दिसतो. गावाच्या अभावग्रस्त जगण्याची वणवण अजून तरी थांबलेली दिसत नाही. भौतिक सुविधांच्या आधुुनिक जगण्यात गावाचा मानसिक तोल मात्र पार बिघडून गेलाय, विस्कटून गेलाय, म्हणूनच गाव हळूहळू आत्मघाताच्या दिशेनं वाटचाल करताना दिसतोय.
- रवींद्र पांढरे, पहूर (पेठ), ता.जामनेर, जि.जळगाव

Web Title: Desperate by the needs of the village, the happiness of the village: the moisture is complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.