निविदा मंजूर होवूनही दोन महत्वाच्या प्रकल्पांच्या कामाला सुरुवात होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 08:26 PM2019-12-02T20:26:35+5:302019-12-02T20:26:52+5:30
१०० कोटींमधील ४२ कोटींच्या कामांचीही प्रतीक्षा : निधी आणला कामांची गती संथ
जळगाव : स्वच्छ भारत अंतर्गत मंजूर झालेल्या ३२ कोटी रुपयांच्या डीपीआरमधून बायोमायनिंग व घनकचरा प्रकल्पाच्या कामासाठी निविदा काढून २ महिने होवूनही अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही. आधीच डीपीआर मंजूर होवून २० महिन्यांचा काळ झाला आहे. त्यातही निविदा मंजूर होवूनही कामाला सुरुवात न झाल्याने घनकचरा प्रकल्पाचे काम लांबतच जात आहे. तर दुसरीकडे मनपाला शासनाकडून मिळालेल्या १०० कोटी रुपयांच्या कामातूनही एकही कामाला सुरुवात झालेली नाही.
मनपाचा घनकचरा प्रकल्प गेल्या सात वर्षांपासून बंद आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी दररोज २२० टन हून अधिक कचरा टाकला जात असून, सात वर्षात तब्बल २ लाख टनहून अधिक कचरा या ठिकाणी कुठल्याही प्रक्रियेविना पडून आहे. या ठिकाणच्या कचऱ्यावर रासायनिक प्रक्रियेमुळे आगी लागण्याचे प्रमाण वाढले असून, आगीमुळे पसरणाºया विषारी धुरामुळे परिसरातील व ग्रामीण भागातील सुमारे २० हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
हरित लवादाच्या आदेशाकडेच दुर्लक्ष
घनकचरा व्यवस्थापन कायद्यातंर्गत मार्च २०१९ मध्ये मनपाला हरित लवादाकडून आलेल्या पत्रात प्रक्रियेविना पडलेल्या कचºयावर बायोमायनिंग करण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच या आदेशानंतर ही प्रक्रिया ६ महिन्याचा आत होणे अपेक्षित होते. मात्र, हे आदेश देवून पाच महिन्यांचा काळ झाला आहे.
घनकचरा प्रकल्पासाठी १४ कोटी रुपयांची निविदा लक्ष्मी कस्ट्रक्शन तर बायोमायनिंगसाठी ४ कोटी रुपयांची निविदा ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटला मक्ता देण्यात आला आहे. मात्र, अजूनही कामाला सुरुवात न झाल्याने हरित लवादाकडून मनपा प्रशासनावर याबाबत ताशेरे ओढले जाण्याची शक्यता आहे.
घनकचरा प्रकल्पाचा आराखडा संबधित मक्तेदाराने तयार करून दिला असून, बांधकामाला देखील लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती मनपाचे प्रकल्प अभियंता योगेश बारोले यांनी दिली.
४२ कोटींच्या निविदाही रखडल्या
आमदार सुरेश भोळे यांनी शहराच्या विकासासाठी ९०० कोटी रुपयांचा निधी आणल्याचा दावा करण्यात येतो. त्यापैकी अमृत अंतर्गत पाणी पुरवठा व मलनिस्सारण योजनेच्या कामाला सुरुवात झाली असली तरी कामांची गती संथ आहे. तसेच शिवाजीनगर उड्डाणपूलाचे काम देखील संथ असल्याने १८ पैकी ६ महिने वाया गेले आहेत. १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर होवून दीड वर्षाचा कार्यकाळ झाला आहे. मात्र, या निधीतून एक ही रुपयाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. १०० पैकी ४२ कोटी रुपयांच्या कामांना शासकीय मंजूरी मिळूनही तब्बल तीन महिन्यांचा काळ होवून, या निधीमधून होणाºया कामांच्या निविदा देखील काढण्यात आलेल्या नाहीत. तर उर्वरित ५८ कोटी रुपयांच्या कामांनाही अजून प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला अजून दोन महिने तरी प्रतीक्षा करावी लागणार असेच सध्याचे चित्र पहायला मिळत आहे.
दररोज २५ मोकाट कुत्र्यांचे होणार निर्बीजीकरण
मनपा प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्तासाठी अमरावती येथील एका संस्थेला निर्बीजीकरणाचे काम दिले असून, गेल्या आठ दिवसांपासून निर्बींजीकरणाच्या कामाला सुरुवात झाले असून, आतापर्यंत १०० मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले. शहरात एकूण १६ हजार मोकाट कुत्रे असून, दररोज २५ कुत्र्यांवर निर्बिजीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांनी दिली.
बायोमायनिंग व घनकचरा प्रकल्पाच्या कामाला कार्यादेश देण्यात आले आहेत. बायोमायनिंगच्या कामाला या आठवड्यात सुरुवात होणार आहे. तर घनकचरा प्रकल्पाच्या बांधकामालाही काही दिवसात सुरुवात होईल. बायोमायनिंग व घनकचरा प्रकल्प हे दोन्ही ही कामे एकाचवेळी होतील.
-योगेश बोरोले, प्रकल्प अभियंता