जामठी येथे व्यायामशाळा असूनही ठरतेय निरर्थक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 02:58 PM2020-09-12T14:58:52+5:302020-09-12T15:00:40+5:30
जामठी या गावात व्यायामशाळा असूनही ती साहित्याअभावी निरर्थक ठरत असल्याचे चित्र आहे.
विकास पाटील
जामठी, ता.बोदवड, जि.जळगाव : बोदवड शहराच्या उत्तरेला नऊ किलोमीटर अंतरावरील जामठी या गावात व्यायामशाळा असूनही ती साहित्याअभावी निरर्थक ठरत असल्याचे चित्र आहे.
अडीच हजार लोकसंख्येचे जामठी हे बाजारपेठेचे गाव आहे. परिणामी येथे वर्दळ असते. अशा या गावात २००१-२००२ मध्ये सुमारे दोन लाख ९४ हजार ३६२ रुपये निधीतून ‘महाराणा प्रतापसिंह व्यायामशाळेचे’ बांधकाम करण्यात आले. तत्कालिन खासदार वाय.जी. महाजन यांच्या निधीतून हे बांधकाम ते पूर्णत्वास आले.
बांधकाम झाल्यानंतर ही व्यायामशाळा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत करण्यात आली. व्यायामशाळेचे बांधकाम तर झाले, पण तरुणांना व्यायाम करण्यासाठी या व्यायामशाळेत व्यायामाचे कोणतेही साहित्य उपलब्ध करून देण्यात आले नाही. परिणामी गेल्या १८ वर्षांपासून ही व्यायामशाळा बांधकाम पूर्ण होऊनही निरुपयोगी ठरत आहे.
व्यायामाच्या साहित्याअभावी तरुणांना मोकळ्या रस्त्यावर व्यायाम करावा लागत आहे. बांधकाम झालेल्या या व्यायामशाळेत आजच्या स्थितीत काही वेळा जुगार चालतो, तर केव्हा गांजा फुंकणारे दिसतात, अशी तरुणांची व्यथा आहे.
दरम्यान, व्यायामशाळेकडे ग्रामपंचायत किंवा कोणीही पुढारी फिरकून पाहत नाही, अशी तरुणांची व्यथा आहे. गावात व्यायामशाळा असल्यावरही गावातील तरुण मुले साहित्याअभावी रस्त्यावर कसरत करताना दिसत आहेत. व्यायामशाळेत सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे. जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांनी या व्यायामशाळेची पहाणी करून क्रीडा विभागाकडून अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी माागणी जामठीतील तरुणांनी केली आहे.
सर्व गावातील तरुण मंडळी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे आपल्या समस्या मांडणार आहेत.
-महेंद्रसिंग बिरसिंग पाटील, तरुण, जामठी