ऑक्सिजन पातळी ३८ असूनही ५० दिवस कोरोनाशी लढून ती परतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:39+5:302021-05-29T15:24:03+5:30
राजकोरबाई हिला कोरोना झाल्यामुळे धुळे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तब्बल १९ दिवस या रुग्णालयात उपचार करण्यात आले.
संजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : खाजगी दवाखान्यात १९ दिवस उलटले होते. कोरोना मानगुटीवर बसला होता. केव्हाही जीव जाऊ शकतो, असे सांगत डॉक्टरांनी रुग्ण महिलेस घरी नेण्यास सांगितले. त्यावेळी ऑक्सिजन पातळी होती फक्त ३८; पण जबर इच्छाशक्ती आणि डॉक्टरांच्या प्रयत्नाने मांडळच्या राजकोरबाई कोळी (५०) हिने जिद्दीने कोरोनाशी लढत मृत्यूलाही परतवून लावले.
राजकोरबाई हिला कोरोना झाल्यामुळे धुळे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तब्बल १९ दिवस या रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, राजकोरबाईच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. दुसरीकडे खाजगी दवाखान्यातील खर्च परवडत नव्हता. अखेर तेथील डॉक्टरांनी आशा सोडली आणि राजकोरबाईचे केव्हाही काहीही होऊ शकते, असे सांगत घरी नेण्यास सांगितले. डॉक्टरांनी आशा सोडल्यावर नातेवाईकही हतबल झाले. असेच मरणावर कसे सोडणार म्हणून भाऊ अशोक कोळी व इतरांनी प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यांना विनंती केली की, काही करा पेशंट जाणार आहेच; पण दाखल करून ऑक्सिजन लावा. साधारणतः महिनाभरपूर्वीची २६ एप्रिलची ती वेळ होती.
या काळात अमळनेरात बेड उपलब्ध नव्हते. प्रशासनाने तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करून घेतले. राजकोरबाईचा ऑक्सिजन फक्त ३८ आणि एचआरसीटी स्कोअर १९ आणि उच्च रक्तदाब होता तो वेगळाच.
रुग्णाला वाचवण्याचे प्रयत्न करणे हे कर्तव्य समजून डॉ. प्रकाश ताडे, डॉ. आशिष पाटील, डॉ. संदीप जोशी, डॉ. मेहमूद, डॉ. तनुश्री फडके, डॉ. प्रशांत कुलकर्णी, डॉ. सागर पाटील, डॉ. परेश पवार, डॉ. नरेंद्र पाटील, सर्व कर्मचारी आणि परिचारिका असे सर्व जण कामाला लागले.
ऑक्सिजन लावल्यानंतरही या महिलेचा ऑक्सिजन फक्त ८६ होता तरी त्यांनी गोळ्या औषधी, इंजेक्शन वेळेवर सुरू केले. तीन दिवस जणूकाही ही महिला मृत्यूशय्येवर होती. जेवण नाही, बोलणे नाही. अशी परिस्थितीतही डॉक्टरांनी तिला बायपॅप मशीन लावले. हाय फ्लो ऑक्सिजन लावला. हळूहळू महिला प्रतिसाद देऊ लागली.
डॉक्टरांच्या आशा पल्लवित झाल्या आणि त्यांनी महिलेला सकारात्मक प्रेरणा देणे सुरू केले. राजकोरबाईने देखील जगण्याची जिद्द ठेवली. कोरोनावर राज करणारच म्हणत उपचाराला प्रतिसाद देऊ लागली. ग्रामीण रुग्णालयात ३१ दिवसांनंतर महिलेचा ऑक्सिजन ९५ ते ९६ येऊ लागला अन् एकूण ५० दिवस कोरोनाशी लढून ती महिला घरी परतली.
जाताना डॉक्टरांच्या चेहऱ्यावर यशाचा आनंद होता. सर्वांनी गेटवर येऊन तिला कोरोनामुक्तीचे प्रमाणपत्र देऊन शुभेच्छा दिल्या. महिला व तिच्या कुटुंबीयांनाही अश्रू आवरणे कठीण झाले होते.