लक्ष्मीपूजनानंतरही सोने खरेदीचा उत्साह कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 12:21 PM2019-10-30T12:21:56+5:302019-10-30T12:22:35+5:30

मुहूर्त साधण्यासाठी सुवर्णनगरीत गर्दी

Despite Lakshmipuja, the enthusiasm of buying gold continued | लक्ष्मीपूजनानंतरही सोने खरेदीचा उत्साह कायम

लक्ष्मीपूजनानंतरही सोने खरेदीचा उत्साह कायम

Next

जळगाव : दिवाळीतील सर्व मुहूर्तावर यंदा मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची खरेदी होऊन दिवाळी खरेदी १८५ कोटींवर पोहचली आहे. सोने खरेदीचा उत्साह अद्यापही कायम असून सोन्याचे भाव ३८ हजार ६०० रुपये प्रती तोळा तर चांदीचे भाव ४७ हजार रुपये प्रती किलो असले तरी दररोज रात्री १० वाजेपर्यंत सुवर्णपेढ्यांमध्ये गर्दी असल्याचे चित्र आहे. बाजारात यंदा केवळ सोन्यामध्येच ६५ कोटींची उलाढाल होऊन चारचाकी दुचाकी, कार, एलईडी,फ्रीज, वाशिंग मशिन यांनाही मोठी मागणी राहिली. सलग सुट्या आल्यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी आहे.
सुवर्ण झळाली
सोेने खरेदीला सुवर्णनगरी जळगावात नवरात्रोत्सवापासून झळाली मिळाली. दिवाळीमध्ये प्रत्येक मुहूर्ता सोने खरेदीसाठी गर्दी होती. सोन्यात ५० टक्के ग्राहकी मणी-मंगळसूत्र, अंगठी, पाटल्या, कर्णफुले इत्यादीमध्ये होती. १५० फर्ममध्ये ६० कोटींची झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. लक्ष्मीपूजनापर्यंत मोठी खरेदी झाल्यानंतर पाडवा व भाऊबीजेलाही सराफ दुकानांमध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. या दोन दिवसात १० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.
पाडव्याचा मुहूर्त साधला
साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त असलेल्या दीपावली पाडव्यालादेखील सोने खरेदीस अनन्य साधारण महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवसापेक्षा पाडव्याला सोने खरेदीला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जेवढी गर्दी झाली, त्यापेक्षा अधिक गर्दी पाडव्याला झाल्याचे सांगण्यात आले.
अजून आठवडाभर गर्दी कायम राहणार
सुवर्ण बाजारात अजून आठ दिवस गर्दी कायम राहणार आहे. कारण जळगाव जिल्ह्यातील माहेरवासीणी येथे आल्यानंतर वर्षभरातील केलेल्या बचतीतून जळगावातील सोने खरेदी करतात. जळगावच्या लेकी राज्यात अथवा इतरत्र कोठेही असल्या तरी भाऊबीजेसाठी माहेरी आल्यानंतर त्या जळगावातूनच सोने खरेदी करून नेतात, असे विक्रेत्यांनी सांगितले.
चारचाकी, दुचाकींचे दालने फुल्ल
दिवाळी पाडवा तसेच भाऊबीजेला चारचाकी व दुचाकीच्या दालनात गर्दी झाली होती. लक्ष्मीपूजनाच्या मुहुर्तापर्यंत ११०० दुचाकींची विक्री झाल्यानंतर त्यात दोन दिवसाच आणखी भर पडून ही संख्या १५००वर पोहचली. चारचाकीच्या दालनातही असेच चित्र होते. या दोन दिवसात ५० चारचाकींची भर पडून यंदा ४५० नवीन चारचाकी रस्त्यावर आल्या.
इलेक्ट्रॉनिक्स बाजारात उत्साह
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दालनातही पाडव्याला तसेच भाऊबीजेला गर्दी दिसून आली. एलईडी, फ्रिज, वाशिंग मशिन यांना मोठ्या प्रमाणात मागणी राहिली. मोबाईल खरेदीसाठीदेखील विविध दुकानांवर गर्दी होती. यामध्य ेजवळपास ३०० मोबाईल विक्री झाल्याचे सांगण्यात आले.
कपडे खरेदीची लगबग
बाजारपेठेत दिवाळीसाठी कपडे खरेदी झाल्यानंतर भाऊबीजेलादेखील देवाण-घेवाण करण्यासाठी कपड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. यामध्ये रेडीमेड कपड्यांना अधिक मागणी होती. फुले मार्केटमध्ये तर पाय ठेवायला जागा नसल्याचे चित्र दिसून आले.
पाऊस थांबल्याने वाढली गर्दी, वाहनांच्या लांब रांगा
बाजारपेठेत विविध वस्तूंच्या खरेदीसाठी शहरवासीयांसह जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामुळे वाहने लावण्यास जागाही कमी पडत होती. संध्याकाळी तर विविध चौकांमध्ये वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मंगळवारीदेखील असेच चित्र शहरात होते. सलग सुट्या व त्यात मंगळवारी पावसाने उसंत घेतल्याने खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती.
यंदा फराळाच्या साहित्यालाही मोठी मागणी राहिली. वाजवी, रास्त दरात फरसाण व मिठाई विक्रीचे अनेक स्टॉल शहरात लावण्यात आले होते. एकूण मिठाईत २ कोटीपर्यंत उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. त्यात निम्मे ग्राहकी माव्याच्या पदार्थांची व अर्ध्यामध्ये फरसाण २५ टक्के, मैदा व बेसनपीठाचे पदार्थ २५ टक्के आहे. दुकानदार, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार, कामगार वर्ग बाजारपेठेतील उलाढालीचा केंद्र ठरला.
खरेदीचा अंतिम टप्पा
गणेशोत्सवापासून विविध कंपन्यांच्या सवलतीच्या योजना सुरू होतात. या योजनांचा अंतिम टप्पा म्हणजे दिवाळी. सणांच्या काळात प्रत्येकवेळी यापेक्षा चांगली आॅफर पुढे येईल, या उद्देशाने अनेकवेळा खरेदी पुढे ढकलली जाते. परंतु दिवाळी हा वर्षातील शेवटचा सण असल्यामुळे सर्व कंपन्यांच्या घसघशीत सूट देणाऱ्या आॅफर्स असल्याने अनेकजण दिवाळीला सर्वच वस्तूंची खरेदी वाढल्याचे सांगण्यात येत आहे. या व्यतिरिक्त सजावटीची खरेदी, पूजेचे साहित्य, कॉस्मेटीक, पादत्राणे व इतर वस्तूंमध्ये मोठी उलाढाल झाली.

यंदा सुवर्ण खरेदीला चांगला प्रतिसाद आहे. दिवाळीतील सर्व मुहूर्तावर दररोज खरेदीसाठी गर्दी होती. दररोज रात्रीपर्यंत गर्दी होत असून ती आठवडाभर कायम राहू शकते.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन

यंदा दिवाळीच्या काळात चारचाकी खरेदीस मोठा प्रतिसाद मिळाला. ग्राहकांनी धनत्रयोदशीला मोठ्या प्रमाणात चारचाकींची खरेदी केली. त्या सोबतच लक्ष्मीपूजन व दिवाळी पाडव्यालाही काही वाहनांची विक्री झाली.
- उज्ज्वला खर्चे, विक्री व्यवस्थापक.

Web Title: Despite Lakshmipuja, the enthusiasm of buying gold continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव