नोटीस बजावूनही तरसोद ते फागणे महामार्गाच्या कामाला गती येईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:18 AM2021-02-16T04:18:32+5:302021-02-16T04:18:32+5:30
जळगाव : तरसोद ते फागणे महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असून या विषयी नोटीस देऊनही उपयोग नसल्याने या ...
जळगाव : तरसोद ते फागणे महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असून या विषयी नोटीस देऊनही उपयोग नसल्याने या कामाबाबत संबंधित अधिकारी, सल्लागार, संबंधित एजन्सी या सर्व अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलाविण्यात यावी, अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी केली आहे. या विषयी त्यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. या मार्गाचे केवळ १० टक्केच काम झाले असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.
तरसोद ते फागणे दरम्यान महामार्गाचे काम गेल्या ५ वर्षांपासून सुरू असून या कामाच्या दिरंगाईमुळे या महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. बऱ्याच ठिकाणी खड्डे असल्याने दररोज होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात असून आतापर्यंत २५० जणांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे खासदार पाटील यांनी नमूूद करीत हा विषय थेट लोकसभेत उपस्थित केला. या विषयी ते म्हणाले की, आजही या महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याने येथून प्रवास करणाऱ्या बऱ्याच लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. या विषयी आपण जिल्हा विकास समन्वय व देखरेख समिती (दिशा) आणि रस्ते सुरक्षा सभेपुढे विषय ठेवल्यानंतर संबंधित कंत्राटदार व प्रशासकीय यंत्रणांना नोटीस बजावण्यात आली. तरीदेखील अद्याप हे काम अतिशय धीम्यागतीने सुरू आहे. यामुळे जनतेत तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या तरसोद, असोदा, ममुराबाद, आव्हाणे, बांभोरी, पाळधी, एकलग्न, वराड, पिंपळकोठे, एरंडोल, धारागीर, तुराटखेडा, सावखेडा, सार्वे, म्हसवे, पारोळा, विदखेडा, दळवेल, मुकटी, अजंग, फागणे या मार्गालगतच्या व परिसरातील नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात आहे. याकरिता संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणे गरजेचे आहे. जेणेकरून या महामार्गाच्या दिरंगाईबाबत दिशानिर्देश देता येतील, असे खासदार पाटील म्हणाले.
केवळ १० टक्केच काम
या महामार्गाची लांबी ८७.३ किमी आहे, त्यापैकी आतापर्यंत जवळपास १० टक्केच काम झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. या करिता संथ गतीने सुरू असलेल्या तरसोद ते फागणे महामार्गाच्या बांधकामाबाबत संबंधित अधिकारी, सल्लागार, संबंधित एजन्सी या सर्व अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलाविण्यात यावी, अशी मागणी केली.