ऑक्सिजन ३८ असूनही ५० दिवस कोरोनाशी लढून ती परतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:16+5:302021-05-28T04:13:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : खासगी दवाखान्यात १९ दिवस उलटले होते...कोरोना मानगुटीवर बसला होता...केव्हाही जीव जाऊ शकतो म्हणून ...

Despite oxygen 38, she returned after a 50-day battle with the corona | ऑक्सिजन ३८ असूनही ५० दिवस कोरोनाशी लढून ती परतली

ऑक्सिजन ३८ असूनही ५० दिवस कोरोनाशी लढून ती परतली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : खासगी दवाखान्यात १९ दिवस उलटले होते...कोरोना मानगुटीवर बसला होता...केव्हाही जीव जाऊ शकतो म्हणून डॉक्टरांनी सांगितले घरी घेऊन जा....ऑक्सिजन फक्त ३८ ...मरू दिल्याचे पाप लागू नये, म्हणून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात महत्प्रयासाने फक्त मृत्यूची वाट पाहण्यासाठी दाखल करण्यात आले... डॉक्टरांनी आपले प्रयत्न चिकाटीने केले... पन्नास दिवस मांडळची राजकोरबाई जिद्दीने कोरोनाशी लढली अन मृत्यूवर विजय मिळवलाच.

मांडळ येथील राजकोरबाई कोळी हिला कोरोना झाल्यामुळे धुळे येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तब्बल १९ दिवस खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले; मात्र राजकोर बाईच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. खासगी दवाखान्यातील खर्च परवडत नव्हता. अखेर तेथील डॉक्टरांनी आशा सोडली आणि राजकोरबाई आता जिवंत राहू शकत नाही म्हणून घरी नेण्यास सांगितले. नातेवाईक हतबल झाले. असेच मरणावर कसे सोडणार म्हणून भाऊ अशोक कोळी व इतरांनी ताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यांना विनंती केली की, काही करा पेशन्ट मरणार आहेच; पण दाखल करून ऑक्सिजन लावा. साधारणतः महिनाभरापूर्वीची २६ एप्रिलची ती वेळ होती.

बेड उपलब्ध नव्हते तरी प्रशासनाने तिला दाखल करून घेतले. राजकोरबाईचा ऑक्सिजन फक्त ३८ आणि एचआरसीटी स्कोअर १९ आणि उच्च रक्तदाब होता. आलेल्या रुग्णाला वाचवण्याचे प्रयत्न करणे, हे कर्तव्य समजून डॉ. प्रकाश ताडे, डॉ. आशिष पाटील, डॉ. संदीप जोशी, डॉ. मेहमूद, डॉ. तनुश्री फडके, डॉ. प्रशांत कुलकर्णी, डॉ. सागर पाटील, डॉ. परेश पवार, डॉ. नरेंद्र पाटील, सर्व कर्मचारी आणि परिचारिका सर्वांनी जातीने लक्ष घालणे सुरू केले.

ऑक्सिजन लावल्यानंतरही त्या महिलेचा ऑक्सिजन फक्त ८६ होता तरी त्यांनी गोळ्या औषधी, इंजेक्शन वेळेवर सुरू केले. तीन दिवस जणू काही ती मृत्यूशय्येवर होती. जेवण नाही, बोलणे नाही अशी परिस्थिती आल्यावरही डॉक्टरांनी तिला बायपॅप मशीन लावले. हाय फ्लो ऑक्सिजन लावला. हळूहळू महिला प्रतिसाद देऊ लागली. डॉक्टरांच्या आशा पल्लवित झाल्या आणि त्यांनी महिलेला सकारात्मक प्रेरणा देणे सुरू केले. राजकोरबाईनेदेखील जगण्याची जिद्द ठेवली. कोरोनावर राज करणारच म्हणत उपचाराला प्रतिसाद देऊ लागली.

डॉक्टरांनी हळूहळू तिचा ऑक्सिजन कमी केला, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर लावले, नंतर पाच दिवस ऑक्सिजन बंद केला. ग्रामीण रुग्णालयात ३१ दिवसांनंतर महिलेचा ऑक्सिजन ९५ ते ९६ येऊ लागला अन् एकूण ५० दिवस कोरोनाशी लढून ती महिला घरी परतली.

जाताना डॉक्टरांच्या चेहऱ्यावर यशाचा आनंद लपला नव्हता. सर्वांनी गेटवर येऊन तिला कोरोनामुक्तीचे प्रमाणपत्र देऊन शुभेच्छा दिल्या. महिला व तिच्या कुटुंबीयांनी डॉक्टर आणि प्रशासनाचे आभार मानले.

===Photopath===

270521\27jal_5_27052021_12.jpg

===Caption===

ऑक्सिजन ३८ असूनही ५० दिवस कोरोनाशी लढून ती परतली

Web Title: Despite oxygen 38, she returned after a 50-day battle with the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.