निराधारांना मिळाले शासनाचे साहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:16 AM2021-05-08T04:16:45+5:302021-05-08T04:16:45+5:30
डमी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंधांची घोषणा करताना पाच विविध योजनांच्या लाभार्थींना विशेष ...
डमी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंधांची घोषणा करताना पाच विविध योजनांच्या लाभार्थींना विशेष साहाय्य योजनेंतर्गत या काळात प्रत्येकी एक हजाराची मदत देण्याची घोषणाही केली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण २ लाख ४० हजार ४७२ जणांना ही मदत मिळाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यांची एकत्रित रक्कम लाभार्थींना देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने तालुका स्तरावर ही रक्कम पाठवली आहे. त्यात जळगाव तालुक्यातील लाभार्थींना साहाय्याच्या रकमेचे धनादेश बँकेत पाठवण्यात आले आहेत. सोमवारपर्यंत त्यांना ही रक्कम मिळेल.
राज्य सरकारने १५ मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीत नागरिक अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही कामासाठी बाहेर निघू शकणार नाहीत. त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडत आहेत. अल्प उत्पन्न स्तरातील नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यासाठी सरकारने विशेष साहाय्य योजनेत प्रत्येक लाभार्थीला एक हजार रुपये देण्याचा
निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण २ लाख ४० हजार ४७२ लाभार्थींना ही रक्कम मिळाली आहे.
वृद्धापकाळ निवृत्ती योजनेचे सर्वाधिक लाभार्थी
जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी हे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे आहेत. त्यात ८९ हजार ४१५ लाभार्थी आहेत, तर इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेचे फक्त ५५८ लाभार्थी आहेत.
विशेष साहाय्य योजनेंतर्गत लाभार्थी संख्या
संजय गांधी निराधार अनुदान योजना ५८,२८४
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ७८,९०१
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना ८९,४१५
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना १३,३१४
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना ५५८
एकूण २,४०,४७२
किती आला निधी
एप्रिल महिन्यासाठी २५ कोटी ७७ लाख २४ हजार ७०० रुपये, मे महिन्यासाठी २५ कोटी ७७ लाख २४ हजार ७०० रुपये निधी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. त्यासोबतच मार्च महिन्याचा शिल्लक भाग ११.५० कोटींचा निधी देखील याच काळात जिल्हा प्रशासनाला मिळाला. त्यानंतर हा निधी तालुक्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. तालुका प्रशासनाला मिळालेला निधी तेथून थेट डीबीटीद्वारे लाभार्थींच्या खात्यात पाठवण्यात आला. जिल्ह्यातील सर्व लाभार्थींना हा निधी मिळाला आहे.
शासनाकडून पाठवण्यात आलेला ६३ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाने तालुक्यांच्या मागणीनुसार त्यांच्याकडे पाठविला आहे. त्यानुसार हा निधी लाभार्थींना मिळत आहे.
- जितेंद्र कुंवर, तहसीलदार, संगांयो शाखा
जिल्हा प्रशासनाकडून एप्रिल आणि मे अशा दोन्ही महिन्यांचा निधी प्राप्त झाला आहे. त्याची बिले मंजूर झाली असून, ती बँकांमध्ये देखील पाठविण्यात आली आहेत. ही रक्कम सोमवारी जळगाव तालुक्यातील सर्व लाभार्थींना मिळेल.
- नामदेव पाटील, तहसीलदार, जळगाव
शासनाने जाहीर केलेली रक्कम अजून मिळालेली नाही. बँकांमध्ये चौकशी केली तर एक-दोन दिवसांत हे पैसे येतील, असे सांगण्यात येते. बँकेतही येऊ दिले जात नाही. पैसे मिळणार कसे?
- लक्ष्मी जोहरे
शासनाने ही रक्कम देताना लवकर द्यायला हवी. अजूनही हे पैसे मिळालेले नाहीत. बँकेत चौकशी देखील करता येत नाही. पैसे कधी मिळणार, याची वाट पाहत आहोत.
- लीलाबाई पाटील